IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का, संपूर्ण हंगामातून ‘हा’ खेळाडू बाहेर | पुढारी

IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का, संपूर्ण हंगामातून ‘हा’ खेळाडू बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 ची (IPL 2024) तयारी सध्या जोरात सुरू आहे. याबाबत बीसीसीआयकडून अपडेट्सही दिले जात आहेत. खेळाडू आपापल्या संघांसाठी इकडे तिकडे खेळत असतील, पण इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझींचे संपूर्ण लक्ष त्यांच्या तयारीवर असते. दरम्यान, एकेकाळची आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पीटीआयने त्यांच्या एक्स अकौंटवर याबाबतचा खुलासा केला आहे. मात्र, बीसीसीआय आणि गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीवर अद्याप काहीही वक्तव्य केलेले नाही.

विश्वचषक 2023 मध्ये खेळल्यानंतर संघाबाहेर

मोहम्मद शमीने भारतासाठी 2023 मध्ये आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळली. सुरुवातीचे काही सामने तो प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पण त्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्याने प्रत्येक सामन्यात भेदक मारा केला. त्याच्या गोलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची दमछाक झाली. भारतीय संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा ठरला. पण असे असले तरी तो जखमी होता आणि औषध घेत खेळत राहिला. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली. असे मानले जात होते की आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि खेळताना दिसेल.

इंडियन प्रीमियर लीग सुरू व्हायला अजून एक महिना बाकी आहे, पण त्याच दरम्यान, शमी आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता पीटीआयच्या वृत्तातून समोर आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचा दावा पीटीआय वृत्तसंस्थेने केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर यूकेमध्ये शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (IPL 2024)

गुजरात टायटन्सला मोठा धक्का

शमीला आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्जकडून खेळला आहे. आता तो जीटी म्हणजेच गुजरात टायटन्सकडून खेळतो. 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने आतापर्यंत 110 सामन्यांमध्ये 127 विकेट घेतल्या आहेत. अगामी हंगामात त्याची अनुपस्थिती जीटी संघासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. हार्दिक पंड्या आधीच संघ सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. आता हे पाहणे रंजक ठरेल की शमी खरोखरच बाहेर गेला तर गुजरात टायटन्स संघात त्याच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश होतो.

Back to top button