IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार! | पुढारी

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 17 हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका असूनही या स्पर्धेचे सर्व सामने भारताच खेळवले जातील, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) पीटीआयशी बोलताना दिली.

भारतात एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तारखा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही.

धुमाळ यांनी सांगितले की, सुरुवातीला फक्त पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित लढतींचे वेळापत्रक निश्चित केले जाईल. आम्ही 22 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याचा विचार करत आहोत. यासाठी सरकारी संस्थांशी सल्लामसलत करून काम करत आहे. पण एक निश्चित आहे की, संपूर्ण स्पर्धा भारतात होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2009 मध्ये आयपीएलचे सर्व सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले गेले. तर 2014 चा संपूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही ही स्पर्धा भारतातच खेळवली गेली. यंदा आयपीएलचा 17 वा हंगाम असून ही स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसांतच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आयपीएलचा (IPL 2024) अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.

पहिला सामना सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स? (IPL 2024)

भारतीय क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या आयसीसी स्पर्धेची सुरुवात 1 जून 2024 रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होईल. दरम्यान, आयपीएलचा सलामीचा सामना गतवर्षी अंतिम फेरीतील चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल अशी चर्चा आहे.

Back to top button