IND vs ENG Ranchi Test : रांचीच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड कसे आहे? जाणून घ्या आकडेवारी | पुढारी

IND vs ENG Ranchi Test : रांचीच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड कसे आहे? जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG Ranchi Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे सुरू होणार आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मंगळवार 20 फेब्रुवारीला दोन्ही संघ रांचीला पोहोचतील. त्यानंतर 21 आणि 22 फेब्रुवारीला दोन्ही संघ सराव करतील. दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर रांचीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 20 फेब्रुवारीपासून या सामन्याची ऑफलाइन तिकिटेही विकली जात आहेत. स्टेडियमजवळ चार काउंटर बनवण्यात आले आहेत.

रांचीच्या मैदानावर टीम इंडिया कसोटीत अजिंक्य आहे. येथे भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. मार्च 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवण्यात आला होता, जो अनिर्णित राहिला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला होता. या दोन कसोटी सामन्यांमध्ये सहा फलंदाजांनी शतके झळकावली असून त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नावे दोन द्विशतके आहेत. (IND vs ENG Ranchi Test)

पुजाराचा कांगारूंना संयमी तडाखा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेएससीए स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला, जो अनिर्णित राहिला. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला फलंदाजी करत स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकांच्या जोरावर 451 धावा केल्या. भारतानेही कांगारूंना दमदार प्रत्युत्तर दिले. टीम इंडियाचा मधल्या फळीतील आश्वासक फलंदाज चेतेश्वर पुजाराने द्विशतक झळकावले. त्याने तब्बल 525 चेंडूंचा सामना करत 202 धावांची खेळी साकारली. याच सामन्यात ऋद्धिमान साहानेही 117 धावा केल्या. ज्यामुळे भारताने पहिल्या डावात 603 धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात 204 धावा केल्या. भारतीय संघाला त्यांचा दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

हिटमॅनकडून आफ्रिकन गोलंदाजांची कुटाई

2019 मध्ये रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावांची शानदार खेळी खेळली होती. त्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेनेही शतक झळकावले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 162 धावांवर बाद झाला. भारताने पाहुण्या संघाला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी आफ्रिकन संघाने भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण घातले आणि त्यांचा संपूर्ण संघ केवळ 133 धावांत गारद झाला. अशाप्रकारे भारताने तो सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला.

रांचीच्या मैदानावर दोन सामन्यात 6 शतके (IND vs ENG Ranchi Test)

रोहित शर्मा : 212 धावा : विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2019)
अजिंक्य रहाणे : 115 धावा : विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2019)
स्टीव्ह स्मिथ : 178 धावा : विरुद्ध भारत (2017)
ग्लेन मॅक्सवेल : 104 धावा : विरुद्ध भारत (2017)
चेतेश्वर पुजारा : 202 धावा : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2017)
वृद्धिमान साहा : 117 धावा : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2017)

Back to top button