Ishan Kishan : इशानचा बीसीसीआयला पुन्हा ठेंगा

Ishan Kishan : इशानचा बीसीसीआयला पुन्हा ठेंगा
Published on
Updated on

रांची, वृत्तसंस्था : झारखंडचा खेळाडू इशान किशनने (Ishan Kishan) रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीतील सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वारंवार सांगूनही यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे टाळले आहे. इशानने हा निर्णय वैयक्तिक कारणाने घेतला असल्याचे सांगितले; मात्र त्याची ही कृती बीसीसीआयच्या आदेशाविरुद्ध आहे. त्यामुळे याचा त्याच्या कारकिर्दीवर आणि टीम इंडियातील निवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळावे, त्यानंतरच त्याचा टीम इंडियातील निवडीसाठी विचार केला जाईल, असे सांगितले होते.

त्यानंतर बीसीसीआयनेदेखील प्रत्येक करारबद्ध आणि फिट असलेल्या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे सांगितले होते; मात्र इशान किशनने बीसीसीआयच्या या आदेशाकडे पुन्हा एकदा कानाडोळा केला आहे. झारखंडकडून खेळणार्‍या इशान किशनने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीतील सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असल्याचे सांगितल्यानंतरही इशान किशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इशान किशनचे नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले होते की, बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे. ते म्हणाले की, जर तुम्ही फिट असाल, तर देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याबाबतचे कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही.

इशान किशनचा बडोद्यातील किरण मोरे अ‍ॅकॅडमीत सराव (Ishan Kishan)

इशान किशनने पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी न खेळणे पसंत केले आहे. तो किरण मोरे अ‍ॅकॅडमीत सराव करतोय, यावरून तो फिट असल्याचे बोलले जात आहे. त्याने यापूर्वी मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून ब्रेक घेतला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने ध्रुव जुरेल या युवा विकेटकिपर फलंदाजाला संधी दिली आहे. त्याने पहिल्याच सामन्यातच 46 धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो संघात आल्यानंतर तोच पहिली पसंती असेल; मात्र त्याचा बॅकअप म्हणून बीसीसीआय कसोटीत ध्रुव जुरेल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संजू सॅमसनचा विचार करू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news