NZ vs SA : द. आफ्रिका पहिल्या दिवसअखेर 6 बाद 220 | पुढारी

NZ vs SA : द. आफ्रिका पहिल्या दिवसअखेर 6 बाद 220

हॅमिल्टन; वृत्तसंस्था : फिरकीपटू रचिन रवींद्रने 3 बळी घेत जोरदार ब—ेक लावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध येथील दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 6 बाद 220 धावांवर समाधान मानावे लागले. रवींद्रने मधल्या फळीतील झुबेर हमझा, किगन पीटरसन व डेव्हिड बेडिंगहम यांचे बळी घेतले. त्याने दिवसभरात 21 षटके गोलंदाजी करताना केवळ 33 धावा देत यजमान संघाला पहिल्या दिवशी उत्तम वर्चस्व प्राप्त करून दिले. (NZ vs SA)

दिवसभरातील शेवटच्या टप्प्यात मात्र न्यूझीलंडला रुआन डे स्वार्ट व शॉन बर्ग यांनी सातव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी साकारल्याने बरेच झगडावे लागले. रुआनने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अगदी थाटात साजरे केले, तर अष्टपैलू शॉनने 37 व्या वर्षी पदार्पण करताना या डावात विशेष चमक दाखवली. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी स्वार्ट 55, तर शॉन बर्ग 34 धावांवर खेळत होते. या लढतीसाठी न्यूझीलंडने संघ निवडीत घेतलेले काही निर्णय अतिशय धक्कादायक ठरले. किवीज संघाने पहिल्या कसोटीत 6 बळी घेणार्‍या नियमित फिरकीपटू मिचेल सँटेनरला संघाबाहेर ठेवण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. त्यांनी या लढतीसाठी 4 जलद गोलंदाजांसह डावखुर्‍या रचिन रवींद्रला खेळवणे पसंत केले. (NZ vs SA)

दक्षिण आफ्रिकन कर्णधार नील ब—ँडनेदेखील नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आणखी एक धक्का दिला. सेडॉन पार्कवरील मागील 11 कसोटी सामन्यांत प्रथम फलंदाजी घेणारा तो केवळ दुसरा कर्णधार ठरला. येथील खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे पहिल्या टप्प्यात जलद गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली. विल ओरुके व नील वॅग्नर यांनी पहिल्या सत्रात काही धक्के दिले आणि उपाहाराअखेर दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 64 अशी स्थिती होती.

2 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 फरकाने आघाडीवर असून, दक्षिण आफ्रिकेला मालिकेत नमवण्यासाठी ही लढत अनिर्णित ठेवणेदेखील त्यांच्यासाठी पुरेसे ठरणार आहे. यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्यात किवीज संघातर्फे रचिन रवींद्रने पहिलेवहिले शानदार द्विशतक साजरे केले होते.

हेही वाचा :

Back to top button