टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन | पुढारी

टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात अखेर श्वास घेतला. ते भारताचे माजी सलामीवीर आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वडील होते.

1952 साली पदार्पण

दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1959 मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून त्यांची पहिली मालिका इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध होती. मात्र, भारतीय संघाने त्या मालिकेतील पाचही कसोटी गमावल्या. गायकवाड यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. 1961 साली त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे खेळला.

गायकवाड यांची आकडेवारी

दत्ताजीरावांनी 11 कसोटीत 350 धावा केल्या, ज्यात फक्त 1 अर्धशतकाचा समावेश आहे. त्यांनी 110 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 36.40 च्या सरासरीने 5,788 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 17 शतके आणि 23 अर्धशतके फटकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 249 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या नावावर 14 शतकांसह 3,139 धावा आहेत. ते देशांतर्गत क्रिकेट 17 वर्षे खेळले.

दत्ताजीराव गायकवाड हे 1957-58 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने वडोदरा येथील मोतीबाग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघाचा एक डाव आणि 51 धावांनी पराभव केला होता.

गायकवाड हे भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सी. एस नायडू यांचे विद्यार्थी होते. 1984 मध्ये बडोद्याच्या महाराजांनी युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सी.एस. नायडू यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी, गायकवाड 12 वर्षांचे होते आणि बडोद्यात भारताचे माजी कर्णधार सीके नायडू यांनी सुरू केलेल्या पहिल्या अंडर-14 आणि 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.

अंशुमन गायकवाड यांचे वडील

दत्ताजीराव गायकवाड हे माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वडील आहेत. अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 दरम्यान 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

Back to top button