BCCI vs Ishan Kishan : ईशान किशनवर बीसीसीआय नाराज? ‘या’ कारणामुळे होणार कारवाई? | पुढारी

BCCI vs Ishan Kishan : ईशान किशनवर बीसीसीआय नाराज? ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI vs Ishan Kishan : टीम इंडियाचा भाग नसलेल्या पण त्याचवेळी रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेत नसणा-या खेळाडूंवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नाराज असल्याचे समजत आहे. अशा खेळाडूंवर बोर्डाकडून कारवाईचा बडगा उचलाला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या यादीत यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशानने ऐनवेळी संघ व्यवस्थापनाकडे ब्रेक मागितला होता, त्यानंतर तो सातत्याने क्रिकेटपासून दूर आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही यावर प्रतिक्रिया देत, ‘इशान किशनला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला थोडे क्रिकेट खेळावे लागेल’, असा मोलाचा सल्ला दिला होता.

मात्र, ईशानने द्रविड गुरुजींच्या सल्ल्याकडे कानाडोळा केला आहे. तो अद्याप एकही रणजी सामना खेळलेला नाही. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, इशान किशनने पंड्या ब्रदर्ससोबत सराव सुरू केला आहे. अशा परिस्थितीत इशान रणजी ट्रॉफीसाठी नव्हे तर आयपीएलसाठी तयारी करत असल्याचा दावा केला जात होता. अशा परिस्थितीत रणजी ट्रॉफीदरम्यान खेळाडू आयपीएल मोडमध्ये आल्याने बीसीसीआय प्रचंड संतापले असल्याची चर्चा आहे. (BCCI vs Ishan Kishan)

दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘जे खेळाडू सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहेत, त्यांना पुढील काही दिवसांत रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडून कळवले जाईल. यातून फक्त अनफिट आणि एनसीएमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंना सूट दिली जाईल. जानेवारीपासून आयपीएल मोडमध्ये असलेल्या काही खेळाडूंबद्दल बोर्ड फारसे खूश नाही’, असे इशान किशनचे नाव न घेता इशारा दिला आहे. (BCCI vs Ishan Kishan)

Back to top button