बेनोनी; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन युवा संघाने भारतीय युवा संघाचा 79 धावांनी पराभव करून चौथ्यांदा विश्वचषक पटकावला. या पराभवाने भारतीयांचे पुन्हा हार्टब्रेक झाले असून आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सच्या ींपराभवाचे उट्टे काढण्याची संधी भारतीय युवा संघाने गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 253 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताला 43.5 षटकांत 174 धावांची मजल मारता आली. भारत आतापर्यंत पाच वेळा या स्पर्धेचा विजेता ठरला होता; परंतु त्यांना विश्वविजयाचा षटकार ठोकण्यात अपयश आले. (U-19 Cricket WC Final)
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव केला आहे. याचबरोबर त्यांनी चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला. भारताने 2012 आणि 2018 च्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. (U-19 Cricket WC Final)
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 254 धावांचे आव्हान पार करताना भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने सर्वाधिक 47 धावा केल्या. मात्र, या धावा करण्यासाठी त्याने 77 चेंडू देखील घेतले. भारताकडून आदर्शव्यतिरिक्त फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. मुशीर खानने 22 तर मुरगन अश्विनने 42 धावा केल्या. नमन तिवारीने 13 धावांची खेळी करत मुरगनला साथ देण्याचा प्रयत्न केला.
भारताचा संपूर्ण संघ 174 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून बिअर्डमन आणि मॅकमिलनने भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताचा वेगवान गोलंदाज राज लिम्बानीने सॅम कोंटासला शून्यावर बाद करीत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर भारताने अचूक गोलंदाजी केली आणि त्यांना डोके वर काढू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 55 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांचे अर्धशतक हुकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्युज बेवगेन हा 48 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर हॅरी डिक्सन हा 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑलिव्हर पीकने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि नाबाद 46 धावा केल्या. भारताकडून यावेळी राज लिंबानीने भेदक गोलंदाजी केली. लिम्बानीने 10 षटकांत 38 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. लिम्बानीला यावेळी चांगली साथ दिली ती नमन तिवारीने. नमनने यावेळी दोन फलंदाजांना बाद केले. सौमी पांडे आणि मुशीर खान यांनी यावेळी प्रत्येकी एक बळी मिळवला.
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने अंतिम सामन्यात 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी 1998 च्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरोधात खेळताना 242 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा जमवल्या होत्या.