INDvsENG 2nd Test : भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर संपुष्‍टात, इंग्‍लंडसमोर ३९९ धावांचे आव्‍हान

INDvsENG 2nd Test : भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर संपुष्‍टात, इंग्‍लंडसमोर ३९९ धावांचे आव्‍हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. स्पर्धेचा आज (दि. 4) तिसरा दिवस आहे. आज भारताचा स्‍टार फलंदाज शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव २५५ धावांवर संपुष्‍टात  आला असून, ३९८ धावांची आघाडी मिळाली आहे. या सामन्‍यात विजयासाठी इंग्‍लंडला ३९९ धावांचे आव्‍हान पेलावे लागणार आहे. (IND vs ENG, 2nd Test Day 3)

यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने 255 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य आहे.

इंग्‍लंडचा फिरकीपटू रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव संपवला. दुसर्‍या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 104 धावा केल्या. अक्षर पटेलने 45 आणि रविचंद्रन अश्विनने 29 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

 शुभमनचे 11 महिन्यांनंतर शतक

शुभमन गिलने 12 डाव आणि 11 महिन्यांनंतर शतक झळकावले. त्याने अखेरचे शतक 9 मार्च 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध एकूण 12 डाव खेळले. यामध्ये त्याला एकही अर्धशतक आणि शतक करता आले नाही. शुभमनने आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. ही त्याची क्रमांक 3 वरील सर्वोत्तम धावसंख्या आहे. या पोझिशनमध्ये त्याने प्रथमच फिफ्टी प्लसचा स्कोअर गाठला. हे त्याचे कसोटीतील तिसरे शतक ठरले आहे. त्याच्या नाववर 4 अर्धशतकेही आहेत. त्याची उर्वरित 2 शतके बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.

दुसऱ्या सत्रात भारताने गमावली नाही विकेट

दुसऱ्या सत्राच्या पहिल्या तासात टीम इंडियाने एकही विकेट गमावली नाही. या कालावधीत संघाने 16 षटकांत 68 धावा केल्या. शुभमन गिलने अक्षर पटेलच्या साथीने 72 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

श्रेयस-शुभमनमध्ये 81 धावांची भागीदारी

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली. श्रेयस 29 धावा करून टॉम हार्टलीचा बळी ठरला. हार्टलीने 28 व्या षटकाचा पहिला चेंडू गुड लेन्थवर टाकला. त्यामुळे श्रेयस पुढे गेला आणि मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला पण त्याची बॅट फिरली. चेंडू मिड-ऑफला उंच गेला. त्याचवेळी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने उलटी धाव घेत सुमारे 20 मीटर अंतर कापले आणि डायव्हिंगद्वारे उत्कृष्ट झेल घेतला.

डीआरएसमुळे शुभमन गिल वाचला

शुभमन गिल डीआरएसमुळे दोनदा वाचला. दहाव्या षटकातील टॉम हार्टलीचा चौथा चेंडू त्याच्या पॅडला लागला. इंग्लंडने एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि अंपायरने आऊटचा निर्णय दिला. शुभमनने रिव्ह्यू घेतला, रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागल्याचे दिसून आले. पुढच्याच षटकात शुभमन पुन्हा एकदा बचावला. 11व्या षटकातील पाचवा चेंडू जेम्स अँडरसनने गुड लेंथवर इन-स्विंगर टाकला. इंग्लंडने पुन्हा एलबीडब्ल्यूचे अपील केले पण यावेळी अंपायरने नॉट आऊट दिले. इंग्लंडने रिव्ह्यू घेतला, रिप्लेमध्ये चेंडू स्टंपला स्पर्श करून जात असल्याचे दिसून आले. पण तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला.

पहिल्‍या डावात यशस्‍वी जैस्‍वालचे स्‍मरणीय द्विशतक

तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. शुभमन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर 27 धावा करून झेलबाद झाला. श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. अक्षरने 27 धावा केल्या. श्रीकर भरत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी 179 धावांवर नाबाद राहिला आणि रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अश्विन लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला, पण यशस्वी त्याचे द्विशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने 290 चेंडूत 209 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.

भारताच्या 396 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने चांगली सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या. बेन डकेट 17 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाला, पण क्रॉलीने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने अवघ्या 52 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून इंग्लंडची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या पुढे नेली. तो 76 धावा करून बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने ठराविक अंतराने इंग्लंडला धक्के दिले.

इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 143 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. 47 धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. (INDvsENG 2nd Test)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news