IND vs ENG 2nd Test : युवा खेळाडूंचा जोरदार सराव | पुढारी

IND vs ENG 2nd Test : युवा खेळाडूंचा जोरदार सराव

विशाखापट्टणम, वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभत पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे; पण या विशाखापट्टणम कसोटीपूर्वी (IND vs ENG 2nd Test) रवींद्र जडेजा व के. एल. राहुल यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने भारताचे टेंन्शन वाढले आहे. सर्फराज खान आणि रजत पाटीदार हे दोन युवा फलंदाज संघात दाखल झाले आहेत, तरीही मनोबल उंचावलेल्या इंग्लंडचा सामना करण्यासाठी यजमानांना चांगली कंबर कसावी लागणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु, आजच्या ऑप्शनल सराव सत्रात रोहितने दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आजपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी बुधवारी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला; पण आजच्या ऑप्शनल सराव सत्रात केवळ सहा युवा खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसले. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, रजत पाटीदार आणि सौरभ कुमार यांनी आज सराव केला. सर्फराज, पाटीदार व कुमार यांचा दुसर्‍या कसोटीसाठी विराट, के. एल. राहुल व रवींद्र जडेजा यांच्याजागी संघात समावेश केला गेला आहे. सराव सत्रादरम्यान सर्फराज व रजत यांच्यात बराच वेळ चर्चाही सुरू असल्याचे दिसले. दरम्यान, फॉर्मशी झगडणारा गिल डावखुर्‍या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर सराव करताना दिसला.

बुधवारी संपूर्ण संघ सरावाला आला होता. गुरुवारी सकाळी यशस्वी, गिल, सौरभ कुमार, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार आणि सर्फराज खान हे केवळ सहा खेळाडू वैकल्पिक सत्रात सरावासाठी आले. अकराव्या स्थानासाठी लढत असलेल्या अनकॅप्ड रजत आणि सर्फराज यांनी नेटदरम्यान दीर्घकाळ गप्पा मारल्या, असे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे.

दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ यातून निवडणार : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के. एस. भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test)

स्थळ : विशाखापट्टणम
वेळ : स. 9.30 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्टस् 18
लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ सिनेमा

Back to top button