INDvsENG Test Day 4 : इंग्लंड विजयापासून 3 विकेट दूर, श्रेयस बाद 13 धावांवर बाद | पुढारी

INDvsENG Test Day 4 : इंग्लंड विजयापासून 3 विकेट दूर, श्रेयस बाद 13 धावांवर बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबाद कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. इंग्लंडने दिलेल्या 231 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. टीम इंडियाच्या विकेट एकापाठोपाठ एक पडत आहेत. सध्या भारताची धावसंख्या 57 षटकांत 7 बाद 153 झाली असून विजयासाठी अजून 78 धावांची गरज आहे.

श्रेयस अय्यर बाद

श्रेयस अय्यर 13 धावा करून स्लिपमध्ये झेलबाद झाला. जॅक लीचने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 24 धावांत भारताने 4 विकेट गमावल्या.

जडेजा धावबाद

रवींद्र जडेजा 2 धावा करून धावबाद झाला. तो जो रूटच्या फुल टॉसवर एकेरी धाव घेण्यासाठी धावला, पण शॉर्ट मिडऑनला उभा असणा-या कर्णधार बेन स्टोक्सने विकेट्सवर थेट थ्रो करून विकेट्स उदवल्याज्यामुळे जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतला.

22 धावांवर केएल राहुल एलबीडब्ल्यू

अक्षरनंतर केएल राहुलही बाद झाला. त्याला जो रूटने एलबीडब्ल्यू केले. राहुलने 22 धावा केल्या. 107 धावांवर भारताने 5वी विकेट गमावली. रूटने पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या.

अक्षर पटेल बाद

अक्षर पटेल तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला टॉम हार्टलेने झेलबाद केले. अक्षर 17 धावा करून बाद झाला. त्याने डावात 3 चौकार मारले. केएल राहुल आणि अक्षरमध्ये 32 धावांची भागीदारी झाली.

राेहित आऊट

टॉम हार्टलेने १८ व्‍या षटकामध्‍ये टीम इंडिया मोठा धक्‍का दिला. कर्णधार रोहित शर्माला त्‍याने पायचीत केले. त्‍याने ५८ चेंडूत सात चौकार झळकावत ३९ धावा केल्‍या. ६३ धावांवर भारताला तिसरा धक्‍का बसला.

हार्टलेचे एका षटकात दोन बळी

यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली.जैस्वालने 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शॉर्ट लेगवर झेलबाद झाला. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर हार्टलेने शुभमन गिलचीही विकेट घेतली.

हैदराबाद कसोटीत दुसऱ्या दिवसापर्यंत दडपणाखाली राहिल्यानंतर चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडचा संघ वरचढ ठरला. दुसऱ्या डावात 420 धावा करून संघ सर्वबाद झाला. ओली पोपला द्विशतकाने हुलकावणी दिली. तो 196 धावा करून बाद झाला. पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडिया दुसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरणार आहे. लक्ष्य गाठण्यासाठी संघाकडे 5 सत्रे आहेत. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 4 आणि रविचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 2 आणि अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली.

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंड संघाने 4 विकेट गमावल्या. यासह त्याचा दुसरा डाव संपुष्टात आला. या सत्रात इंग्लिश संघाने 25.1 षटकांत 104 धावा केल्या. ओली पोपने दुसऱ्या डावात 196 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने या सत्रात 2 बळी घेतले. अश्विन आणि जडेजा यांनाही प्रत्येकी एक बळी मिळाला.

पोपचे द्विशतक हुकले

जसप्रीत बुमराहने ऑली पोपला क्लिन बोल्ड करून इंग्लंडला 10वा धक्का दिला. ओली पोप 196 धावा करून बाद झाला. तो स्कूप मारण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू चुकला. आपल्या शतकी खेळीत पोपने 21 चौकार मारले.

अश्विनने हार्टलेला केले बोल्ड

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडला 8वा धक्का दिला. त्याने 101 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टॉम हार्टलीला क्लिन बोल्ड करून केले. हार्टले 34 धावा करून बाद झाला, त्याने ओली पोपसोबत 80 धावांची भागीदारी केली.

राहुलने पोपचा झेल सोडला

केएल राहुलने दुसऱ्या स्लिपमध्ये ओली पोपचा सोपा झेल सोडला. 95 व्या षटकात मोहम्मद सिराजने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू टाकला. पोप कट करायला गेला पण चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुलकडे गेला. राहुलने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू हातातून सुटला. जीवदान मिळाले त्यावेळी पोप 186 धावांवर फलंदाजी करत होता. अक्षर पटेलनेही 110 धावांवर त्याचा झेल सोडला होता.

इंग्लंडच्या 400 धावा पूर्ण

इंग्लंडने 96 व्या षटकात 400 धावा पूर्ण केल्या. ओली पोपने रवी अश्विनविरुद्ध एक धाव घेत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. यासह संघाची आघाडीही 210 धावांपर्यंत वाढली.

हार्टले-पोपची अर्धशतकी भागीदारी

ओली पोपने 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टॉम हार्टलेसोबत पन्नासची भागीदारी केली. या दोघांनी यासाठी केवळ 62 चेंडू घेतले.

इंग्लंडच्या 350 धावा पूर्ण

इंग्लंडने 86व्या षटकात 350 धावा पूर्ण केल्या. रविचंद्रन अश्विनच्या षटकात एकेरी धाव घेत पोपने संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. यासह इंग्लंडची आघाडीही 160 धावांपर्यंत वाढली.

इंग्लंडची सातवी विकेट

इंग्लंडची सातवी विकेट 339 धावांवर पडली. रेहान अहमद 53 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला केएस भरतकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. त्याने ओली पोपसोबत 64 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावातही रेहान बुमराहचा बळी ठरला होता.

पोप-रेहान अहमदची अर्धशतकी भागिदारी

चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या षटकात लेगस्पिनर रेहान अहमदने शतकवीर ओली पोपसोबत अर्धशतक भागीदारी पूर्ण केली. जडेजाच्या विरुद्ध ३६ धावा करत त्याने हे यश मिळवले. रेहानने चौथ्या दिवशी 16 धावा करत आपला डाव सुरू ठेवला.

ओली पोपचे दीड शतक

ओली पोपने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात 150 धावा पूर्ण केल्या. जसप्रीत बुमराहविरुद्ध एकेरी धाव घेऊन त्याने 212 चेंडूत ही कामगिरी केली.

चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला सुरुवात

चौथ्या दिवशी इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव 6 बाद 316 धावसंख्येपासून सुरू केला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. ओली पोपच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघाने 126 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र जिंकण्यात इंग्लंडला यश आले, तर भारतासाठी कठीण होईल. तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारत ड्रायव्हिंग सीटवर होता, मात्र तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 144 धावा करत भारतासमोर अडचणी निर्माण केल्या. ऑली पोप नाबाद 148 धावांसह क्रीजवर आहे. चौथ्या दिवशी प्रथम पोपची शिकार करण्याची भारताची योजना असेल. जर टीम इंडियाने पाहुण्यांचा पहिल्या तासात ऑलआऊट केला तर त्यांना मोठे लक्ष्य मिळण्याची आशा कमी आहे.

Back to top button