IND vs ENG Test 2nd Day : भारतीय फलंदाजांचा दबदबा, इंग्लंडविरुद्ध 175 धावांची आघाडी

IND vs ENG Test 2nd Day : भारतीय फलंदाजांचा दबदबा, इंग्लंडविरुद्ध 175 धावांची आघाडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG Test 2nd Day : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात सात विकेट गमावत 421 धावा केल्या असून 175 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा 81 तर अक्षर पटेल 35 धावांवर नाबाद तंबूत परतले. इंग्लंडकडून टॉम हार्टली आणि जो रूटने 2-2 विकेट घेतल्या.

शुक्रवारी (दि. 26) सकाळी 1 बाद 119 धावांपासून पुढे खेळायला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी दोन गडी गमावले. भारतासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने दिवसाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वालची (80 धावा) विकेट गमावली. त्यानंतर शुभमन गिल (23) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. टॉम हार्टलीचा चेंडू सीमापार फटकावण्याच्या नादात तो मिड-विकेटवर उभा असलेल्या बेन डकेटकडे झेल देऊन माघारी परतला.

लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यरसोबत डाव सावरला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, अय्यरला (35) त्याच्या 63 चेंडूंच्या खेळीत खूप अडचणींचा सामना करावा लागला. अहमदने टाकलेला चेंडू स्लॉग स्वीप करताना चेंडू उंच उडाला. त्याचवेळी डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करणा-या हार्टलीने त्याचा सोपा झेल पकडला.

त्यानंतर राहुलने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक झळकावले. तो शतक झळकावेल असे वाटत होते, पण 86 धावांवर तो हार्टलीकरवी रेहान अहमदकडे झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी राहुलने रवींद्र जडेजासोबत 65 धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजा आणि केएस भरत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी 68 धावांची भागीदारी केली. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक झळकावले.

जो रूटने केएस भरतला एलबीडब्ल्यू आऊट केले. भरतला 41 धावा करता आल्या. त्यानंतरव भारताला 358 धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विन एक धाव काढून धावबाद झाला. यानंतर जडेजाने अक्षरसोबत आठव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली.

जडेजाने 155 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या असून अक्षरने 62 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या आहेत. दोघेही दिवसाअखेर नाबाद तंबूत परतले आहेत. इंग्लंडकडून हार्टली आणि रूटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. जॅक लीच आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news