हैदराबाद, वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव 64.3 षटकांत 246 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 23 षटकांत एक विकेट गमावून 119 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 70 चेंडूत 76 आणि शुभमन गिल 43 चेंडूत 14 धावा करून नाबाद तंबूत परतले आहेत. आतापर्यंत या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली आहे.
भारताने इंग्लिश संघाला त्यांच्या बॅजबॉल रणनितीला बॅजबॉलनेच प्रत्युत्तर दिले. यशस्वी जैस्वालने भारताच्या पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर मार्क वुडला चौकार ठोकून आम्हीही आक्रमक खेळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यशस्वी आणि रोहितने झटपट अर्धशतकी भागिदारी रचली. यादरम्यान यशस्वीने 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 12.2 षटकात 80 धावसंख्येवर भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. तो 24 धावा करून बाद झाला. जॅक लीचने भारतीय कर्णधाराची विकेट घेतली. बेन स्टोक्सने रोहितचा झेल पकडला.
जसप्रीत बुमराहने 8.3 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. फिरकी गोलंदाजांच्या वर्चस्वात, मोहम्मद सिराजने फारशी गोलंदाजी केली नाही आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. जडेजाने विरोधी फलंदाजांची खडतर परीक्षा घेतली आणि 3 बळी घेतले. अश्विनने 68 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षरनेही प्रभावी मारा केला आणि 33 धावा देत 2 फलंदाजांना माघारी धाडले. (IND vs ENG 1st Test)
इंग्लंडचा डाव संपुष्टात
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स 88 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. त्याच्या विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपुष्टात आला. स्टोक्सला जसप्रीत बुमराहने बोल्ड केले. स्टोक्सने आपल्या अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
इंग्लंडला 234 धावांवर नववा धक्का बसला. अश्विनने मार्क वुडला क्लीन बोल्ड केले. वुडला 11 धावा करता आल्या. चेंडू टाकण्यापूर्वी भारताने तिसरा रिव्ह्यू गमावला होता. मात्र, अश्विनने याची भरपाई केली.
जडेजाने ५६ व्या षटकात २३ धावांवर खेळणार्या टॉम हार्टलेनला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.
इंग्लंडला 155 धावांवर सातवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहनेही रेहान अहमदला यष्टिरक्षक केएस भरतकडे झेलबाद करून खाते उघडले.
इंग्लंडला 137 धावांवर सहावा धक्का बसला. अक्षर पटेलने बेन फॉक्सला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. त्याने केवळ चार धावांचे योगदान दिले.
इंग्लंडला 125 धावांवर पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने जो रूटला जसप्रीत बुमराहकडे झेलबाद केले. त्याने 60 चेंडूत 29 धावा केल्या.
जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची लंचनंतर ५० धावांची भागीदारीही झाली. मात्र ३३ व्या षटकामध्ये अक्षर पटेल याने ही जोडी फोडली. अक्षरच्या फिरकीवर बेअरस्टो त्रीफळाचीत ( क्लीन बोल्ड) झाला. १२१ धावांवर इंग्लंडला चाैथा धक्का बसला. बेअरस्टोने ५८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता.
इंग्लंडने २६ षटकांत तीन गडी गमावून १०० धावा केल्या आहेत. इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. विनाबाद 55 होत्या. मात्र चार षटकांतच संघाने तीन विकेट गमावल्या. जॅक क्रोली, बेन डकेट आणि ऑली पोप पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. अश्विनला दोन तर जडेजाला एक विकेट मिळाली.
इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी चार षटकात २५ धावा केल्या. मात्र इंग्लंडला पहिला धक्का 12व्या षटकात 55 धावांवर बसला. अश्विनने बेन डकेटला यष्टीचीत ( एलबीडब्ल्यू) केले. डकेट याने ३९ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. १५ व्या षटकामध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑली पोपने रोहितकडे झेल दिला. त्याने केवळ १ धावेचे योगदान दिले. यानंतर पुढील षटकात फिरकीपटू अश्विनच्या गोलंदाजीवर फटकेबाजीच्या प्रयत्नात असणार्या क्रॉलीचा सिराजचे अप्रतिम झेल घेतला. क्रॉलीने ४० चेंडूत २० धावा केल्या. सध्या जो रूट आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, एस. भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)
इंग्लंडविरुद्ध मागील 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने गाजवलेल्या उत्तम वर्चस्वाचा यंदा 5 कसोटी सामन्यांच्या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेत खरा कस लागणे अपेक्षित आहे. मागील 12 वर्षांच्या कालावधीत भारताने इंग्लंडविरुद्ध सलग 16 मालिका जिंकल्या असून यातील 7 मालिकांमध्ये क्लीन स्विप नोंदवला आहे. आजपासून हैदराबादमध्ये खेळवल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात झाली.
यापूर्वी 2012 मध्ये लिस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने भारताला 2-1 फरकाने धूळ चारली होती. मात्र, त्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध सातत्याने एककलमी वर्चस्व गाजवले आहे. भारताने मायभूमीत सर्व संघाविरुद्ध खेळलेल्या मागील 44 सामन्यांत फक्त 3 कसोटी सामने गमावले आहेत. यावरूनही भारताचे वर्चस्व अधोरेखित होते. मागील दशकभराच्या कालावधीत आपल्या खेळाडूंनी अनुकूल खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. मात्र, यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा या दोन दिग्गज खेळाडूंनी प्रतिकूल स्थितीतही आपल्या खेळाची उत्तम चुणूक दाखवून दिली आहे.
चौथ्या स्थानी नेहमीच आश्वासक फलंदाजी करत आलेला विराट कोहली या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार नसून याचा लाभ घेण्याचा इंग्लंड येथे प्रयत्न करेल, हे साहजिक आहे. विराटने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 28 कसोटी सामन्यांत 5 शतकांसह 1991 धावांची आतषबाजी केली. मात्र, या धावांपेक्षाही संघाला आवश्यकता असताना ठाण मांडून उभे राहण्याची विराटची क्षमता येथे उपलब्ध असणार नाही, याची भारतीय थिंक टँकला मुख्य चिंता असणार आहे. (IND vs ENG 1st Test)
पाहुण्या इंग्लंडसाठी भारतीय हवामान नेहमीच प्रतिकूल ठरत आले आहे, हा पूर्वेतिहास आहे. मात्र, येथे भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेत इंग्लंडने डावखुरे जॅक लीच व टॉम हार्टलीसह पदार्पणवीर लेगस्पिनर रेहान अहमद असे तीन फिरकीपटू उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्टलीने 20 प्रथमश्रेणी सामन्यातं 40 बळी घेतले आहेत. जलद गोलंदाजीची मुख्य भिस्त मार्क वूडवरच असणार आहे. इंग्लंडचे तिन्ही फिरकीपटूंमध्ये अनुभवाची कमतरता आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमधील अनिश्चितता पाहता, भारताला कोणत्याच आघाडीवर गाफील राहून चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
अश्विन-जडेजा ही जोडगोळी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे. यातही प्रामुख्याने अश्विनचा सामना कसा करायचा, हाच यक्षप्रश्न सतावत राहिला तर यातही आश्चर्याचे कारण असणार नाही.
आज पहिली कसोटी
स्थळ : हैदराबाद.
वेळ : सकाळी 9.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क
तारीख लढत वेळ ठिकाण
25 ते 29 जानेवारी पहिली कसोटी स. 9.30 पासून हैदराबाद
2 ते 6 फेब्रुवारी दुसरी कसोटी स. 9.30 पासून विशाखापट्टणम
15 ते 19 फेब्रुवारी तिसरी कसोटी स. 9.30 पासून राजकोट
23 ते 27 फेब्रुवारी चौथी कसोटी स. 9.30 पासून रांची
7 ते 11 मार्च पाचवी कसोटी स. 9.30 पासून धर्मशाला