IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई, वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची (IND vs ENG) घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच ठेवण्यात आले असून, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, ऋतुराज गायकवाड यांचा या संघात समावेश नाही. याशिवाय, महत्त्वाची बाब म्हणजे इशान किशन याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून त्याच्याऐवजी के. एस. भरत आणि नवोदित उत्तर प्रदेशचा ध्रुव जुरेल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत असून, कसोटी चॅम्पियनशिपच्या द़ृष्टीने या मालिकेला महत्त्व आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 16 जणांचा चमू शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केला. सर्व वरिष्ठ फलंदाज निवडीसाठी उपलब्ध असल्याने त्यांना अपेक्षेप्रमाणे संघात स्थान मिळाले आहे. गोलंदाजी विभागात शमीची कमतरता दिसत आहे. त्याची दुखापत अजून पूर्ण बरी झाली नसल्यामुळे बीसीसीआयने त्याला विश्रांती देऊन आवेश खानला संधी दिली आहे. संघात त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार हे चार वेगवान गोलंदाज आहेत. तर रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे चौघे फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

निवडण्यात आलेला संघ असा (IND vs ENG)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकिपर), के.एस. भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

उत्तर प्रदेशचा ध्रुव जुरेल नवा चेहरा…

संघ निवडीत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे संघात तीन यष्टिरक्षक निवडण्यात आले आहेत. के.एल. राहुल, के. एस. भरत आणि ध्रुव जुरेल यांना यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. यापैकी के. एस. भरत हा अंतिम 11 जणांत यष्टिरक्षणाचे काम करण्याची शक्यता आहे तर के.एल. राहुल हा संघात पूर्णवेळ फलंदाज म्हणून राहील. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो. दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून मधूनच माघार घेतलेला इशान किशन याच्याकडे यावेळीही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याला वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत होते; परंतु प्रशिक्षक राहुल द्रविडने मोहालीत बुधवारी इशानवर कारवाई झाली नसून मागणीवरून त्याला विश्रांती देण्यात आले असल्याचे सांगितले. यानंतर इशानला इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळण्यासाठी तयार राहण्यास सांगितले असल्याचे वृत्त आले होते; परंतु आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून ध्रुव जुरेल या नवख्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news