Virat Kohli-Rohit Sharma : ‘हिटमॅन’ बनणार 4 हजारी मनसबदार! कोहलीला टाकणार मागे

Virat Kohli-Rohit Sharma : ‘हिटमॅन’ बनणार 4 हजारी मनसबदार! कोहलीला टाकणार मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli-Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना आज गुरुवारी (11 जानेवारी) मोहाली येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना खेळवला जाईल.

पण या सगळ्यामध्ये चाहत्यांच्या नजरा 14 महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे असतील. रोहित आणि कोहली यांच्यात ऐतिहासिक विक्रमासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे.

रोहित पूर्ण करणार 4 हजार धावा?

वास्तविक, सध्या हा विक्रम फक्त कोहलीच्या नावावर आहे. आतापर्यंत त्याने 115 टी-20 सामन्यांमध्ये 52.73 च्या उत्कृष्ट सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. 4 हजार किंवा त्याहून अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याच्यानंतर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहितने आतापर्यंत 148 सामन्यांत 31.32 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. रोहितला 4 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी अजून 147 धावांची गरज आहे. कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नाही. अशा परिस्थितीत रोहितला कोहलीची बरोबरी कोणत्या सामन्यात करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित T20 चा सिक्सर किंग बनू शकतो

रोहितकडे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 200 षटकार मारून ऐतिहासिक विक्रम रचण्याचीही संधी आहे. वास्तविक, सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 140 टी-20 सामन्यांमध्ये 182 षटकार मारले आहेत. त्याने या मालिकेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांविरुद्ध 18 षटकार मारले तर तो इतिहास रचेल. अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल.

मालिकेसाठी भारत आणि अफगाणिस्तानचे संघ :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद आणि गुलबदीन नायब.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news