पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)च्या 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने जोरात तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव झाला असून आता सर्वांच्या नजरा स्पर्धेच्या तारखांकडे लागल्या आहेत. आयपीएलचा नवा हंगाम कधी सुरू होणार हे बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेले नाही. असे असले तरी आगामी सार्वत्रिक निवडणुका असूनही आयपीएलचे सामने भारतातच होतील, असे समजते आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 22 मार्चपासून आयपीएलचा (IPL 2024) 17 वा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा देशाबाहेर हलवण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे समोर आले आहे. दरम्यान, मार्चच्या चौथ्या आठवड्यापासून सुरू होणा-या आयपीएलपूर्वी महिला प्रीमियर लीग (WPL)चे सामने रंगणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेनंतर आयपीएलचे (IPL 2024) वेळापत्रक जाहीर होईल, असे संकेत बीसीसीआयने दिले होते. यापूर्वी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळवले गेले होते. यावेळीही तसेच होईल अशी चर्चा आहे.
बीसीसीआयने (BCCI) गेल्या वर्षी महिला प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. त्यावेळी सर्व सामने एकाच शहरात झाले होते. मुंबईतील वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने खेळवण्यात आले. स्पर्धा उत्कंठावर्धक होण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बीसीसीआयने विविध योजना आखल्या आहेत. रिपोर्टनुसार, यावेळी महिला प्रीमियर लीग (WPL 2024) दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यासाठी दिल्ली आणि बंगळूरची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्सने पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते.