इंग्लंड भारतात आणणार स्वत:चा शेफ | पुढारी

इंग्लंड भारतात आणणार स्वत:चा शेफ

लंडन, वृत्तसंस्था : भारत दौर्‍यावर येणारा इंग्लंड क्रिकेट संघ स्वतःसोबत एक शेफ घेऊन येणार आहे. इंग्लंडने प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या शेफसोबत खास करार केला आहे. ज्या खेळाडूंना मसालेदार गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड पौष्टिक आहाराची व्यवस्था करणार आहे. या महिन्यात सुरू होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर येणार आहे, ज्यामध्ये जागतिक क्रिकेटमधील दोन दिग्गज संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने 2022 मध्ये पाकिस्तान संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर व्हाईटवॉश केले होते, तेव्हा शेफ उमर मेझियानही इंग्लिश संघासोबत पाकिस्तान दौर्‍यावर होता. ‘द टेलिग्राफ’ने एका अहवालात म्हटले आहे की, सात आठवड्यांच्या प्रवासात खेळाडू आजारी पडू नये म्हणून इंग्लंड आपल्या शेफला या महिन्याच्या अखेरीस भारताच्या दौर्‍यावर घेऊन जाईल. हा शेफ 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीपूर्वी संघात सामील होईल. त्याचा उद्देश खेळाडूंच्या पोषक आहाराची काळजी घेणे हा आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका हैदराबादमध्ये सुरू होईल. त्यानंतर विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धर्मशाळा येथे सामने होतील. इंग्लंडने भारतात शेवटची कसोटी मालिका 2012 मध्ये जिंकली होती. संघाने 2021 मध्ये चेन्नईतील पहिल्या कसोटीत विजय मिळवून आपला मागील दौरा सुरू केला होता. परंतु, पुढील तीन कसोटी गमावल्या होत्या.

सेहवागने एकाच वाक्यात जिरवली

या मुद्द्यावर भारताचा माजी खेळाडू सेहवागने मात्र एका वाक्यात इंग्लंडची जिरवली आहे. क्रिकेटपटू आणि समालोचक असलेल्या वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, ‘इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या निवृत्तीनंतर इंग्लंडला शेफची गरज भासत आहे. ‘आयपीएल’ खेळताना मात्र त्यांना स्पेशल शेफची गरज भासत नाही’, असे 45 वर्षीय माजी सलामीवीर म्हणाला. शेफला कुक असेही म्हणतात. इंग्लंडच्या क्रिकेट फॅनबेस बर्मी आर्मीने एक्सवर बातमी शेअर केल्यानंतर सेहवागनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Back to top button