Ranji Trophy : रिंकू सिंगची आणखी एक ‘धडाकेबाज’ खेळी, संघासाठी ठरला ‘संकटमोचक’ | पुढारी

Ranji Trophy : रिंकू सिंगची आणखी एक 'धडाकेबाज' खेळी, संघासाठी ठरला 'संकटमोचक'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध T-20 आणि वन-डे मालिकेत दमदार फलंदाजाचे प्रदर्शन घडविणार्‍या रिंकू सिंग (Rinku Singh) याने  रणजी ट्रॉफीमध्‍येही (Ranji Trophy )  आपल्‍या कामगिरीत सातत्‍य ठेवले आहे. उत्तर प्रदेश आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत त्‍याने पुन्‍हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणजी करंडक स्पर्धेतील ‘ब’ गटातील उत्तर प्रदेश आणि केरळ यांच्यातील  सामना अलप्पुझा येथे सुरु आहे. उत्तर प्रदेश संघाने १२४ धावांवर पाच गडी गमावले. यावेळी रिंकू संघाच्‍या मदतीला धावा. ध्रुव जुरेलसह त्‍याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत उत्तर प्रदेशने 5 गड्यांच्या मोबदल्यात 244 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी रिंकू सिंग103 चेंडूत 71 धावांवर नाबाद राहिला हाेता. आज (दि.६) दुस-या दिवशी रिंकू सिंग याने आपली दमदार खेळी सुरु ठेवली. त्याचे शतक हुकले. (Ranji Trophy : Rinku Singh rescues UP after top-order failure )

Ranji Trophy : १३६ चेंडूत ९२ धावांची खेळी

रिंकू सिंगने केरळविरुद्धच्या सामन्यात १३६ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार फटकावले. रिंकूने ध्रुव जुरेलसह सहाव्या विकेटसाठी १४३ धावांची महत्त्‍वपूर्ण खेळी केली. ध्रुव जुरेलने 123 चेंडूत 63 धावा केल्या. मात्र यानंतर ध्रुव जुरेल बाद झाला. यानंतरही रिंकू सिंगने फलंदाजी सुरू ठेवली. त्‍याच्‍या या खेळीने उत्तर प्रदेशने ३०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. केरळकडून एमडी निदिशने ३ बळी घेतले. (Ranji Trophy : Rinku Singh rescues UP after top-order failure )

देशांतर्गत क्रिकेटमध्‍ये रिंकू सिंग याने आतापर्यंत ५७ अ दर्जाच्‍या सामन्यांमध्ये 48.69 च्या सरासरीने 1899 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. रिंकूने 42 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 57.82 च्या सरासरीने 3007 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीत 7 शतके आणि 19 अर्धशतकी खेळी केल्‍या आहेत.

रजनी ट्रॉफीमध्‍ये केरळनंतर उत्तर प्रदेशचा सामना पश्‍चिम बंगाल संघाशी आहे. हा सामना 12 जानेवारीपासून होणार आहे. यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहार आमने-सामने असतील. बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामना 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.


हेही वाचा : 

 

 

Back to top button