IND vs SA : केपटाऊन विजयाचे ‘हे’ आहेत हिरो

IND vs SA : केपटाऊन विजयाचे ‘हे’ आहेत हिरो
Published on
Updated on

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा बालेकिल्ला असे केपटाऊनचे न्यूलँड्स क्रिकेट मैदान मानले जात होते. न्यूलँड्स क्रिकेट मैदान असे चक्रव्यूह होते, जे आजपर्यंत कोणतेही आशियाई संघ भेदू शकले नाहीत. मात्र, यावेळी भारतीय संघाने (IND vs SA) केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय तर मिळवलाच; पण त्यांना लाजिरवाणा पराभवही दाखवून दिला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करताना प्रथम फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत गुंडाळला. येथेच टीम इंडियाने विजयाचा पाया रचला होता. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावातही आफ्रिकेची फलंदाजी सपशेल फसली आणि ते 176 धावांत सर्वबाद झाले. टीम इंडियाला इतिहास रचण्यासाठी 79 धावांचे लक्ष्य होते, जे भारताने 7 गडी राखून पूर्ण केले. भारताच्या या विजयामध्ये कोणकोणते खेळाडू विजयाचा नायक ठरले, जाणून घ्या.

मोहम्मद सिराज

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याने सहा विकेट घेत खळबळ उडवून दिली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत सर्वबाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्यांना सावरता आले नाही. सिराजने दुसर्‍या डावातही एक विकेट घेतली होती. सिराजला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

रोहित शर्मा (IND vs SA)

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दोन्ही डावात आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या डावात त्याने 7 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडियाला 153 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. दुसर्‍या डावात तो शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच ड्रेसिंग रूममध्ये गेला. हिटमॅनने दुसर्‍या डावात 22 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. रोहितने सामन्याची चांगली सुरुवात करून देणे, ही पुढील फलंदाजांसाठी कायमच सकारात्मक बाब राहिली आहे.

विराट कोहली

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांत सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजीही तितकीशी खास राहिली नाही. एका टोकाकडून खेळाडू सतत बाद होत राहिले. दुसर्‍या टोकाला विराट कोहली एकटाच उभा होता. विराटने पहिल्या डावात टीम इंडियासाठी सर्वाधिक 46 धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि एक षटकारही पाहायला मिळाला. कोहली आणि रोहितमुळे भारताला पहिल्या डावात 153 धावा करता आल्या होत्या. या दोन दिग्गजांनी कामगिरी केली नसती, तर टीम इंडिया अडचणीत सापडली असती.

जसप्रीत बुमराह

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक करावे तेवढे कमी नाही. दुसर्‍या डावात त्याने तर कहर केला. बुमराहने सहा विकेट घेत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. बुमराहने पहिल्या डावातही दोन विकेट घेतल्या होत्या. त्याने कसोटी सामन्यात एकूण आठ विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

मुकेश कुमार

भारतीय संघाकडून कारकीर्दीतील दुसरी कसोटी खेळणार्‍या मुकेश कुमारनेही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुकेशला सिराज आणि बुमराहसारख्या 6-6 विकेट घेता आले नाहीत, पण त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसर्‍या डावात दोन विकेट घेत स्वतःला सिद्ध केले. इतकेच नाही तर मुकेशने पहिल्या डावात 2.2 षटकांमध्ये एकही धाव न देता दोन विकेटस् मिळवल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news