‘आयसीसी’ क्रमवारीत भारताची घसरण; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी | पुढारी

‘आयसीसी’ क्रमवारीत भारताची घसरण; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी

सिडनी, वृत्तसंस्था : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने इतिहास रचला. या मैदानावर यजमान संघाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले. असे असतानाही टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाला भारत-दक्षिण आफ्रिका मालिका अनिर्णीत राहण्याचा फायदा झाला. त्याने पुन्हा अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर कांगारू संघ काही काळ अव्वल स्थानावर राहिला होता. आयसीसी क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 118-118 रेटिंगसह बरोबरीत होते. खात्यात जास्त गुण असल्यामुळे टीम इंडिया अव्वल स्थानावर होती.

भारताचे गुण जास्त, पण रेटिंग कमी

ताज्या आयसीसी रेटिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे 118 रेटिंग आहे. त्याच्या खात्यात 3534 गुण आहेत. त्याचबरोबर मालिका अनिर्णित राहिल्याने भारताला एका मानांकनाचे नुकसान झाले आहे. टीम इंडिया 117 रेटिंग आणि 3746 गुणांसह दुसर्‍या स्थानावर घसरली आहे. इतर संघांच्या क्रमवारीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

मायदेशात इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Back to top button