IND vs SA 2nd Test : सर्वबाद 55..! द. आफ्रिकेचा ‘लाजिरवाणा विक्रम’, भारताविरुद्ध निच्चांकी धावसंख्या | पुढारी

IND vs SA 2nd Test : सर्वबाद 55..! द. आफ्रिकेचा ‘लाजिरवाणा विक्रम’, भारताविरुद्ध निच्चांकी धावसंख्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून सुरू झाला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यजमान संघाचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर गारद झाला.

पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणा-या भारतीय गोलंदाजांनी केपटाऊन कसोटीत अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल वेरनेने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (2), डीन एल्गर (4), टोनी डी जॉर्जी (2), ट्रिस्टन स्टब्स (3), मार्को जॅनसेन (0), केशव महाराज (1), कागिसो रबाडा (2), नांद्रे बर्जर (4) हे आले तसे तंबूत परतले. (IND vs SA 2nd Test)

द. आफ्रिकेची निच्चांकी धावसंख्या

कसोटी इतिहासात भारतीय संघाविरुद्ध एका डावात आफ्रिकन संघाने केलेली ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नोव्हेंबर 2015 मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या केली होती. तेव्हा नागपूर कसोटीत आफ्रिकन संघ 79 धावांत गारद झाला होता. त्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. (IND vs SA 2nd Test)

तसेच, घरच्या मैदानावरही भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकन संघाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी यजमान आफ्रिकेने डिसेंबर 2006 मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या केली होती. त्यावेळी जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकेचा संघ 84 धावांत गारद झाला होता. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेतले होते.

भारताविरुद्ध कोणत्याही संघाची सर्वात निच्चांकी धावसंख्या

कसोटी इतिहासात एखाद्या संघाची भारताविरुद्ध 55 धावांच्या इतक्या कमी धावसंख्येवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही लाजिरवाणी धावसंख्याही द. आफ्रिकेच्या नावावर नोंदवली गेली आहे. यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडला 62 धावांवर रोखले होते. हा सामना डिसेंबर 2021 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्या डावात अश्विनने सर्वाधिक 4 आणि सिराजने 3 विकेट घेतल्या होत्या.

सिराजचा कहर

सिराजने केपटाऊनच्या वेगवान खेळपट्टीवर कहर केला. त्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला उद्ध्वस्त केले. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने आपल्या स्विंग आणि बाऊन्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 9 धावांत 5 बळी घेतले. मोहम्मद सिराजने बेडिंगहॅम आणि मार्को जॅन्सन यांना आपल्या 8व्या षटकात बाद करून पाच बळींचा टप्पा गाठला.

सिराजची ऐतिहासिक कामगिरी

त्याचा पहिला बळी एडन मार्कराम ठरला. आऊट स्विंगवर तो बाद झाला. जैस्वालने स्लिपमध्ये मार्करामचा झेल पकडला. यानंतर सिराजने द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरवर निशाणा साधला. ज्यात भारतीय वेगवान गोलंदाज यशस्वी ठरला. एल्गर क्लिन बोल्ड झाला. टोनी डी जॉर्जीला बाद करून सिराजने तिसरी विकेट आपल्या नावावर केली. त्यानंतर सिराजने 8व्या षटकात पहिला बेडिंगहॅम आणि नंतर जॅनसन यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कंबरडे मोडले. तो पाच विकेट घेतल्यानंतरही थांबला नाही. त्याने 9व्या षटकात वेरनेची विकेट घेतली. अशाप्रकारे, सिराजची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. सिराजने पहिल्यांदाच कसोटी डावात 6 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तर कसोटी कारकिर्दीत तो तिसऱ्यांदा पाच बळी घेण्यात यशस्वी झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये एका डावात पाच बळी घेतल्यानंतर सिराजने आता दक्षिण आफ्रिकेत आपली छाप सोडली आहे.

Back to top button