Team India Schedule : टी20, वनडे, कसोटी… जाणून घ्या नवीन वर्षातील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक | पुढारी

Team India Schedule : टी20, वनडे, कसोटी... जाणून घ्या नवीन वर्षातील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Schedule : नवीन वर्षात टीम इंडियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे. 2024 ची सुरुवात केपटाऊन कसोटीने होत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ही दुसरी आणि शेवटची कसोटी आहे. यानंतर, भारतीय संघ मायदेशी परतेल, जिथे तो अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होईल. ही मालिका 11 मार्चपर्यंत चालणार आहे. यानंतर, थोड्या विश्रांतीनंतर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएलचा) 17 वा हंगाम सुरू होईल, तर त्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच, टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. तिथे 3-3 सामन्यांची टी-20 आणि वनडे मालिका खेळावी लागेल. तर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येईल. यात उभय संघादरम्यान, 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळवले जातील. यानंतर न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. तर वर्षाच्या शेवटी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशाप्रकारे 2024 मध्ये एकूण 14 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. (Team India Schedule)

भारतीय संघाने 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिका विजयाने केली. पण शेवट विजयाने झाला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर द. आफ्रिकेविरुद्धची बॉक्सिंग डे कसोटी गमावण्याची नामुष्की ओढवली. आता मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत विजयाने करायची आहे.

2024 मधील टीम इंडियाचे वेळापत्रक (Team India Schedule)

3 ते 7 जानेवारी : द. आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी
11 ते 17 जानेवारी : अफगाणिस्तान विरुद्ध तीन टी-20 सामने
25 जानेवारी ते 11 मार्च : इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका
22 मार्च ते मे पर्यंत : (आयपीएल, अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.)
4 जून ते 30 जून : टी-20 विश्वचषक (वेस्ट इंडीज, यूएसए)
जुलै : भारताचा श्रीलंका दौरा (3-3 टी20 आणि वनडे सामने)
सप्टेंबर : बांगलादेशचा भारत दौरा, (2 कसोटी आणि 3 टी20 सामने)
ऑक्टोबर ते नोव्हेंबर : न्यूझीलंडचा भारत दौरा, (3 कसोटी सामन्यांची मालिका)
डिसेंबर : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, (4 कसोटी न्यांची मालिका)

Back to top button