KL Rahul Historic Century : केएल राहुल ठरला सुपरस्पोर्ट पार्कवर 2 शतके झळकावणारा पहिला पाहुणा फलंदाज | पुढारी

KL Rahul Historic Century : केएल राहुल ठरला सुपरस्पोर्ट पार्कवर 2 शतके झळकावणारा पहिला पाहुणा फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul Historic Century : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करत शतक झळकावले. सेंच्युरियनमध्ये त्याने 137 चेंडूत 73.72 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 4 षटकारही मारले. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद 70 धावांवर परतलेल्या केएल राहुलने सेंचुरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. तो सुपरस्पोर्ट पार्कवर दोन शतके झळकावणारा पहिला पाहुण्या फलंदाज ठरला आहे. 2021-22च्या दौऱ्यात राहुलने याच मैदानावर शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 123 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. पण त्या सामन्यात तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला नव्हता.

भारतीय यष्टीरक्षकांच्या एलिट लिस्टमध्ये राहुलची एन्ट्री (KL Rahul Historic Century)

आशियाबाहेर शतके झळकावणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या एलिट लिस्टमध्ये केएल राहुलचा समावेश झाला आहे. या यादीत ऋषभ पंत चार शतकांसह अव्वल स्थानावर आहे, तर केएल राहुलने विजय मांजरेकर, अजय रात्रा आणि वृद्धिमान साहा यांची बरोबरी केली आहे. मांजरेकर, रात्रा आणि साहा यांनी आशियाबाहेर प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

द. आफ्रिकेत एकापेक्षा जास्त शतके (KL Rahul Historic Century)

याशिवाय द. आफ्रिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या आशियाई फलंदाजांच्या यादीत राहुलचे नाव जोडले गेले आहे. द. आफ्रिकेत सर्वाधिक शतके झळकावणा-या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरचे (5 शतके) नाव अव्वल स्थानी आहे. यानंतर अझहर महमूद, तिलक समरवीरा, विराट कोहली, केएल राहुल यांचा क्रमांक लागतो.

भारताबाहेर 13 वे शतक

केएल राहुलचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 17 वे शतक ठरले. ज्यापैकी त्याने मायदेशात केवळ चार, तर उर्वरित 13 आंतरराष्ट्रीय शतके भारताबाहेर झळकावली आहेत.

राहुलने पंतला टाकले मागे

यासह, राहुल हा द. आफ्रिकेच्या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. या यादीत ऋषभ पंत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पंतने 2022 मध्ये नाबाद 100 धावा केल्या होत्या. आता राहुलने त्याचा विक्रम मोडला आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 2010 मध्ये 90 धावांची इनिंग खेळली होती. तर दीपदास गुप्ता (63 धावा, वर्ष 2001) आणि दिनेश कार्तिक (63 धावा, वर्ष 2007) संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

राहुलची कसोटीतील कामगिरी

केएल राहुलने 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 48 कसोटी सामन्यांच्या 82 डावांमध्ये 2,743 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 34.29 आणि स्ट्राइक रेट 52.22 राहिली आहे. कसोटीत त्याने 13 अर्धशतके आणि 8 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 आहे.

Back to top button