IND vs SA Test Day2: भारताविरुद्ध द. आफ्रिकेची 11 धावांची आघाडी | पुढारी

IND vs SA Test Day2: भारताविरुद्ध द. आफ्रिकेची 11 धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 11 धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावा केल्या. डीन एल्गर 140 धावा करून नाबाद राहिला. आता भारताला तिसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर दक्षिण आफ्रिकेचा ऑलआऊट करावा लागेल. कारण, द. आफ्रिकेने पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतल्यास भारताला सामन्यात पुनरागमन करणे कठीण होण्याची शक्यता आहे.

डीन एल्गरने शानदार शैलीत कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावले. त्याने पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमसोबत चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 2-2 विकेट घेतल्या. एल्गरसह मार्को जॅन्सन (3* धावा) देखील नाबाद राहिला. तिसर्‍या दिवशीच्या खेळात दोघेही दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाचे नेतृत्व करतील.

तिसऱ्या दिवसाचा खेळ गुरुवारी भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 245 धावा करून भारत ऑलआऊट झाला. केएल राहुलने 101 धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले.

दक्षिण आफ्रिकेने पाच विकेट गमावल्या

दक्षिण आफ्रिकेने 249 धावांत पाच विकेट गमावल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णाने काईल वेरेने याला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी बनवला. लोकेश राहुलने त्याचा झेल घेतला.

दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट

दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट 244 धावांवर पडली. बेडिंगहॅम 56 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला बोल्ड केले. सात षटकार आणि दोन चौकार मारून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

दक्षिण आफ्रिकेचे द्विशतक

दक्षिण आफ्रिकेने 200 धावांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर संघाने 51 व्या षटकात 200 धावा पूर्ण केल्या.

दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 113 धावांवर पडली. सात चेंडूंत दोन धावा करून कीगन पीटरसन बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला बोल्ड केले. बुमराहने सलग दुसऱ्या षटकात विकेट घेत भारतीय संघाला या सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिले.

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट 104 धावांवर पडली. टोनी डीजॉर्ज 62 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले.

द. आफ्रिकेला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेला 11 धावांवर पहिला धक्का बसला. सिराजने एडन मार्करामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत पाच धावा करता आल्या.

तत्पूर्वी आज सामन्याच्या दुस-या दिवशी भारताने कालच्या आठ बाद 208 धावसंख्ये पुढे खेळण्यास सुरुवात केली. केएल राहुलने (101) शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचली. राहुलचे हे कसोटी कारकिर्दीतील 8वे शतक ठरले. तो वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही.

खेळपट्टीचे स्वरूप पाहता यजमान द. आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी ही चांगली धावसंख्या आहे. एकप्रकरे राहुलने भारतीय संघाला ड्रायव्हिंग सीटवर बसवले आहे. आता यजमान फलंदाजांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांची आहे.

Back to top button