WFI Controversy : विनेश फोगटने खेलरत्न, अर्जुन पुरस्कार केला परत | पुढारी

WFI Controversy : विनेश फोगटने खेलरत्न, अर्जुन पुरस्कार केला परत

पुढारी ऑनलाईन डेस्क : WFI Controversy : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. याबाबत तिने मंगळवारी (26 डिसेंबर) सोशल मीडियावरून माहिती दिली.

अलीकडेच कुस्ती महासंघाच्या निवडणुकीमुळे साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. यानंतर बजरंग पुनियानेही त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला होता. आता या मालिकेत सामील झालेल्या विनेशने सोशल मीडियावर एक निवेदन पोस्ट केले आहे. ‘मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे,’ असे तिने जाहीर केले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे विजयी झाले. पण त्यांनंतर अनेक पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. साक्षी मलिकने तर कुस्तीला रामराम करत असल्याचे म्हणत निवृत्तीची घोषणा केली. बजरंग पुनियाने पद्म पुरस्कार माघारी देणार असल्याचे जाहीर केले. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर क्रीडा मंत्रालयाने थेट डब्ल्यूएफआयची नवनिर्वाचित समिती बरखास्त केली. त्यातच आता विनेश फोगाटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

विनेश फोगाटने म्हटलंय की, ‘माननीय पंतप्रधानजी, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करायला कोणी भाग पाडले हे साऱ्या देशाला माहीत आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, त्यामुळे तुमच्यापर्यंत देखील ही बाब पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची मुलगी विनेश फोगाट आहे आणि मागील एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मला आठवते ते वर्ष २०१६, जेव्हा साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. तेव्हा तुमच्या सरकारने तिला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ची ब्रँड ॲम्बेसेडर केले होते. जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे मेसेज पाठवत होत्या. आज साक्षीने कुस्ती सोडली असून मला ते २०१६ हे वर्ष पुन्हा पुन्हा आठवत आहे. आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारी जाहिरातींवर दिसण्यासाठी आहोत काय? त्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, कारण त्यामध्ये लिहिलेल्या घोषवाक्यांवरून तुमच्या सरकारला मुलींच्या हितासाठी गांभीर्याने काम करायचे असल्याचे दिसते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता हे स्वप्न देखील धुळीस मिळत आहे. आगामी महिला खेळाडूंचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होवो, अशी मी प्रार्थना करते.’

Back to top button