Virat Kohli vs South Africa : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ दोन मोठे विक्रम, द. आफ्रिकेत रचणार इतिहास | पुढारी

Virat Kohli vs South Africa : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ दोन मोठे विक्रम, द. आफ्रिकेत रचणार इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs South Africa : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुन्हा मैदानात उतरणार आहे. तो यापूर्वी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याला दिर्घ विश्रांती देण्यात आली. आता द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

भारतीय संघ सध्या द. आफ्रिका दौ-यावर आहे. उभय संघामध्ये आता कसोटी मालिका रंगणार आहे. यातील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनमध्ये तर दुसरा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. या मालिकेत विराटला दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

66 धावा करताच कोहली करेल मोठा विक्रम (Virat Kohli vs South Africa)

विराट 66 धावा करताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. भारताकडून खेळताना त्याने सहावेळा एका वर्षात 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. तो 2023 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 66 धावा दूर आहे. आता पहिल्या सामन्यात 66 धावा केल्यानंतर तो 2023 मध्ये 2000 धावा पूर्ण करेल. असे झाल्यास 7 वेगवेगळ्या वर्षांत 2000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल. विराटशिवाय श्रीलंकेच्या कुमार संगकारानेही सहावेळी एका वर्षात 2000 धावा केल्या आहेत. विराटसोबत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना हा 2023 मधील शेवटचा कसोटी सामना असेल.

वीरेंद्र सेहवागला मागे टाकण्याची संधी

द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये विराट कोहली तिस-या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 1236 धावा आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (1741) आणि दुस-या स्थानी विरेंद्र सेहवाग (1306) आहे. विराटने 71 धावा करताच तो सेहवागला मागे टाकेल आणि द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणा-या भारतीय फलंदाजाच्या यादीत दुस-या क्रमांकावर पोहचेल. (Virat Kohli vs South Africa)

द. आफ्रिकेतील विराटची कामगिरी

विराटने द. आफ्रिकेविरुद्धच्या 14 कसोटी सामन्यांच्या 24 डावांमध्ये 3 शतके आणि 4 अर्धशतकांसह 56.18 च्या सरासरीने 1236 धावा केल्या आहेत. त्याने आफ्रिकेच्या भूमीवर 7 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतकांसह 719 धावा केल्या आहेत. या आकडेवारीत आणखीन भर घालण्याची कोहलीला संधी असेल.

Back to top button