पुढारी ऑनलाईन डेस्क : WFI Controversy : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने WFI ची नवीन कार्यकारिणी तसेच भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले आहे. एवढेच नाही तर भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या सर्व निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता संजय सिंह अध्यक्ष राहणार नाहीत. अलीकडेच WFI निवडणुकीत विजयी झालेले संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू मानले जातात. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाचा पद्मश्री पुरस्कार मागे घेतल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेचे आगामी सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नवीन कुस्ती संघटनेच्या कार्यकारिणीने नियमांविरुद्ध आगामी स्पर्धा आणि कार्यक्रम जाहीर केले होते. ज्यामध्ये नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. यापुढे डब्ल्यूएफआयची नवीन कार्यकारिणी कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या कारवाईवर बजरंग पुनियाने, मला अद्याप याबद्दल माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आल्याचे त्याने म्हटले आहे.
क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, संजय कुमार सिंग यांनी 21 डिसेंबर रोजी जाहीर केले की या वर्षाच्या अखेरीस ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. हे नियमांच्या विरोधात आहे. पैलवानांना तयारीसाठी किमान 15 दिवसांची नोटीस आवश्यक आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढे सांगितले की, 'असे निर्णय कार्यकारिणी समितीद्वारे घेतले जातात ज्यासमोर अजेंडा विचारार्थ ठेवला जाणे आवश्यक आहे. WFI घटनेच्या कलम XI नुसार, बैठकीसाठी 15 दिवसांची सूचना देणे बंधनकारक आहे. अगदी आपत्कालीन बैठक, किमान सूचना कालावधी 7 दिवस आहे. ज्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत, अशा माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नवीन कार्यकारिणी असल्याचे दिसून आले आहे, असेही क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका गेल्या आठवड्यात पार पडल्या. त्यात भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. त्यांनी कुस्तीपटू अनिता शेओरानचा पराभव केला. यानंतर बराच गदारोळ झाला. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत.