Indw vs Ausw test : पहिल्याच दिवशी भारताचे वर्चस्व

Indw vs Ausw test : पहिल्याच दिवशी भारताचे वर्चस्व
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट (Indw vs Ausw test) संघातील गुरुवारपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यावर पहिल्याच दिवशी यजमान भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पाहुण्या संघाला त्यांनी 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या डावात 1 बाद 98 अशी मजबूत सुरुवात केली आहे. स्मृती मानधना 43 धावांवर खेळत आहे.

मोठ्या कालावधीनंतर भारतात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ कसोटी सामना खेळत आहे. गुरुवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला सुरुवात झाली. 'आयसीसी' स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान दिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने 77.4 षटकांत सर्वबाद केवळ 219 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार लिसा हिलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; पण पहिल्याच षटकापासून कांगारूंची डोकेदुखी वाढली. चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या बेथ मुनीला (40) पूजा वस्त्राकरने बाहेरचा रस्ता दाखवला. फोएबे लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही अन् ती जेमिमा रॉड्रिग्जकडून धावबाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्राकरने एलिसे पेरीचा त्रिफळा काढून ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. मग टहली मॅकग्राने अर्धशतकी खेळी करून कांगारूंचा डाव सावरला. तिच्या व्यतिरिक्त किम गार्थने 28 धावा केल्या अन् ती नाबाद परतली.

भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर स्नेह राणा (3) आणि दीप्ती शर्माला (2) बळी घेण्यात यश आले. पाहुणा संघ लवकर बाद झाल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी पुरेशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत असून, टीम इंडियाने 19 षटकांत 1 विकेट गमावून 98 धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मानधना (43) आणि स्नेह राणा (4) धावांसह खेळपट्टीवर टिकून आहेत. सलामीवीर शेफाली वर्माने चांगली सुरुवात केली, पण 40 धावांवर असताना ती जेस जोन्सानची शिकार झाली. शेफाली आणि स्मृतीने पहिल्या बळीसाठी 90 धावांची भागीदारी नोंदवली. भारत दिवसाअखेर 121 धावांनी पिछाडीवर असला, तरी मजबूत स्थितीत आहे.

ऋचा घोषचे कसोटी पदार्पण (Indw vs Ausw test)

या सामन्यातून अवघ्या 20 व्या वर्षी ऋचा घोष आपल्या कसोटी कारकिर्दीत पदार्पण करत आहे. सामन्यापूर्वी त्याला कसोटी संघाची कॅप देण्यात आली होती. भारताकडून कसोटी सामना खेळणारी ती 94 वी महिला खेळाडू आहे. त्याचवेळी लॉरेन चीटल ऑस्ट्रेलियाकडून पहिला सामना खेळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news