Sanjay Singh WFI President : ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह बनले भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष | पुढारी

Sanjay Singh WFI President : ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह बनले भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला आहे. कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (20 डिसेंबर) पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

संजय सिंह हे सध्या वाराणसी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

संजय सिंह हा मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य वाराणसीमध्ये आहे. ते दीड दशकांहून अधिक काळ कुस्ती संघटनेशी जोडले गेलेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2008 पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. संजय सिंह यांची 2009 मध्ये राज्य कुस्तीगीर संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

कोण आहेत अनिता शेओरान?

अनिता शेओरान या ब्रिजभूषण सिंह यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. त्यांनी कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात साक्ष दिली होती. अनिता यांनी कुस्ती क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अनिता शेओरान यांनी ही निवडणूक जिंकली असती तर भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली असती.

Back to top button