ICC Ranking : आयसीसी रँकींगमध्ये शुबमन गिल, रवी बिश्नोईला मोठे नुकसान | पुढारी

ICC Ranking : आयसीसी रँकींगमध्ये शुबमन गिल, रवी बिश्नोईला मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने बुधवारी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत. शुबमन गिलच्या (810) जागी पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (824) पुन्हा एकदा नंबर 1 फलंदाज बनला आहे. तर विराट कोहली (775) तिसऱ्या आणि रोहित शर्मा (754) चौथ्या स्थानावर कायम आहेत.

..म्हणून गिलला नुकसान

गेल्या महिन्यात पार पडलेल्या विश्वचषक 2023 नंतर तिन्ही भारतीय खेळाडूंनी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. गिलने विश्वचषकादरम्यान बाबरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या संघात गिल, कोहली आणि रोहित यांचा समावेश नाहीय. याचा फटका गिलला बसल्याचे चित्र आहे.

वनडे क्रमवारीतील अव्वल 5 फलंदाज

1. बाबर आझम (पाकिस्तान, 824 गुण)
2. शुभमन गिल (भारत, 810 गुण)
3. विराट कोहली (भारत, 775 गुण)
4. रोहित शर्मा (भारत, 754 गुण)
5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया, 745 गुण)

रशीदच्या फिरकीची टी-20मध्ये टॉप ‘गिरकी’ (ICC Ranking)

टी-20च्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीतही मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा आदिल रशीद (715) आता तीन स्थानांनी झेप घेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची (685) राजवट संपुष्टात आणली आहे. बिश्नोईची तिस-यास्थानी घसरण झाली आहे. राशिदने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपल्या फिरकीने चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (692) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा (679) चौथ्या आणि महेश थेक्षाना (670) पाचव्या स्थानावर आहे.

द. आफ्रिकेचा ‘केशव’ वनडे गोलंदाजीत ‘महाराज’ (ICC Ranking)

एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने गोलंदाजीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताचा मोहम्मद सिराज हा वनडे गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन या फॉरमॅटमध्ये अव्वल ऑलराउंडर आहे. तो टी-20 फॉरमॅटमध्येही 271 रेटींग मिळवून अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे.

वनडे क्रमवारीतील अव्वल 5 गोलंदाज

1. केशव महाराज (दक्षिण आफ्रिका, 715 गुण)
2. जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया, 703 गुण)
3. मोहम्मद सिराज (भारत, 685 गुण)
4. अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया, 675 गुण)
५. जसप्रीत बुमराह (भारत, 671 गुण)

टी-20 क्रमवारीत सूर्या अव्वल

टी-20 फलंदाजी क्रमवारीत, सूर्यकुमार यादव (887) पहिल्या स्थानी तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (787) दुस-यास्थानी आहे. सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात झंझावाती शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (755) तिसऱ्या स्थानावर आहे. (ICC Ranking)

कसोटीत विल्यमसन पहिल्या क्रमांकावर

पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध दमदार विजयानंतर कसोटी क्रमवारीतही बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने बाबर आझमला मागे टाकले आहे. बाबर पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारताच्या आर अश्विनने गोलंदाजीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कसोटी अष्टपैलू क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा 455 गुणांसह पहिल्या तर अश्विन 370 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत जडेजा चौथ्या स्थानावर आहे.

Back to top button