IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 8 विकेटस्नी विजय | पुढारी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 8 विकेटस्नी विजय

गकेबेरहा, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 8 विकेटस्नी विजय मिळवला. भारताचा डाव 211 धावांत गुंडाळल्यानंतर टोनी डी झोर्जी (119) याच्या पहिल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य 42.3 षटकांत 2 विकेटस्च्या बदल्यात पूर्ण केले. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा सामना उद्या (गुरुवारी) होणार आहे. शतकवीर टोनी डी झोर्जीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

गोलंदाजांनी भारतीय संघाला स्वस्तात गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी त्यांची मेहनत वाया जाऊ दिली नाही. सलामीवीर रिझा हेंड्रिक्स आणि टोनी डी झोर्जी यांनी कोणतेही दडपण न घेता डावाला सुरुवात केली. दोघांनी 20 षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. या प्रवासात टोनीने 55 चेंडूंत अर्धशतकी पार केले होते. (IND vs SA)

हेंड्रिक्सने मात्र अर्धशतकासाठी 71 चेेंडू घेतले. त्यानंतर मात्र तो लगेच बाद झाला. अर्शदीपने त्याला 52 धावांवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले होते; पण टोनी डी झोर्जी मात्र निर्धाराने खेळत होता. आपला चौथा सामना खेळणार्‍या टोनीने 109 चेंडूंत शतक झळकावले. त्याने व्हॅन डेर डुसेनच्या जोडीने विजय द़ृष्टीक्षेपात आणला होता. परंतु, 5 धावा कमी असताना डुसेन (36) बाद झाला. रिंकू सिंगने ही विकेट घेतली. त्यानंतर टोनीने साई सुदर्शनला षटकार ठोकून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

संबंधित बातम्या

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. साई सुदर्शन (62) आणि कर्णधार के. एल. राहुल (56) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला; पण या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड (4) दुसर्‍याच चेंडूवर माघारी परतल्यानंतर साई सुदर्शन व तिलक वर्मा यांनी काही काळ चांगला खेळ केला. तिलक (10) पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार के. एल. राहुल व साई यांनी चांगली भागीदारी केली. साईने सलग दुसर्‍या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 83 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 62 धावा केल्या. के. एल. राहुल खेळपट्टीवर उभा असताना दुसर्‍या बाजूने संजू सॅमसन (12) व रिंकू सिंग (17) यांनी निराश केले.

के. एल. राहुलने 64 चेंडूंत 56 धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने 18 धावा करून भारताला 211 धावांपर्यंत पोहोचवले. भारताचा संपूर्ण संघ 46.2 षटकांत तंबूत परतला. नांद्रे बर्गरने तीन, ब्युरन हेंड्रिक्स व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.

Back to top button