IPL 2024 Auction : आयपीएल लिलावात रचिन-स्टार्क, कमिन्ससह ‘या’ 10 खेळाडूंवर नजर | पुढारी

IPL 2024 Auction : आयपीएल लिलावात रचिन-स्टार्क, कमिन्ससह ‘या’ 10 खेळाडूंवर नजर

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : आयपीएलचा 17वा हंगाम पुढील वर्षी 23 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी 10 संघ 19 डिसेंबरला खेळाडूंची खरेदी करतील. खेळाडूंच्या लिलावाचा हा कार्यक्रम मंगळवारी (19 डिसेंबर) दुबई येथे दुपारी 1:00 वाजता सुरू होईल. यात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. पण त्यातील 77 खेळाडूच खरेदी करता येतील. यात 30 विदेशी खेळाडूंचा सामवेश असेल.

यंदाच्या लिलावात 10 संघांकडे 262.95 कोटी रुपये शिल्लक आहेत. यापैकी गुजरात, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई 30 कोटींहून अधिक रकमेसह लिलावात उतरतील. यापैकी एका फ्रँचायझीमध्ये आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे, ज्याची किंमत 20 कोटींच्या पुढे जाऊ शकते. (IPL 2024 Auction)

रचिन रवींद्र

न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्रने एकदिवसीय विश्वचषकात छाप पाडली. त्याने 3 शतकांच्या मदतीने 578 धावा चोपल्या. 24 वर्षीय रचिनने भारतीय मैदानांवर 64.22 च्या सरासरीने फिरकी आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध प्रभावी फलंदाजी केली. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसोबतच तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजीही करतो. त्याने न्यूझीलंडसाठी 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुमारे 118 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तो प्रथमच आयपीएल लिलावात उतरत आहे. टी-20 कारकिर्दीतील 53 सामन्यांमध्ये त्याने सुमारे 123 च्या स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत.

आयपीएल लिलावाच्या सेट-2 मध्ये रचिनच्या नावाचा समावेश आहे. या किवी अष्टपैलू खेळाडूने त्याची मूळ किंमत फक्त 50 लाख रुपये ठेवली आहे. आयपीएलमधील सर्व संघांना अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे. गुजरात, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, पंजाब आणि दिल्लीकडे 29 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आहे. यापैकी कोणताही संघ रचिनला खरेदी करू शकतो.

ट्रॅव्हिस हेड

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने वनडे विश्वचषक फायनलमध्ये 137 धावा करत भारताकडून ट्रॉफी हिसकावून घेतली. त्याने या स्पर्धेतील केवळ 6 सामन्यात 2 शतके झळकावून 329 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेटही 127 पेक्षा जास्त राहिला. तो डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने हेड ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो.

हेडने 23 टी-20 सामन्यांत 146 च्या स्ट्राईक रेटने 554 धावा केल्या आहेत. यापूर्वी तो आयपीएलमध्ये खेळला आहे. यादरम्यान त्याने 10 सामन्यांत 138.51 च्या स्ट्राइक रेटने 205 धावा केल्या आहेत. 2017 मध्ये तो RCB कडून शेवटचा आयपीएलचा भाग होता. लिलावाच्या सेट-1 मध्ये हेडच्या नावाचा समावेश आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. एसआरएच, केकेआर, जीटी आणि डीसी या फ्रँचायझींना टॉप ऑर्डर आक्रमक फलंदाजाची गरज आहे. चारही संघांच्या पर्समध्ये 28 कोटींहून अधिक रक्कम आहे, त्यामुळे हेडला विकत घेण्यासाठी हे सर्व संघ सरसावतील. त्यामुळे या ऑस्ट्रेलियन खेळाडूची किंमत 10 ते 15 कोटी पर्यंत जाऊ शकते.

हॅरी ब्रूक

इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रूक आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये प्रत्येक सहाव्या चेंडूवर चौकार मारतो. त्याने 25 टी-20 सामन्यांमध्ये 141.02 च्या स्ट्राइक रेटने 495 धावा केल्या आहेत. ब्रुक अर्धवेळ गोलंदाजीही करतो. कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना प्रभावित केले आहे. गेल्या आयपीएलमध्ये ब्रुकला एसआरएचने 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र तो 11 आयपीएल सामन्यात केवळ 190 धावा करू शकला. यात एका शतकाचा समावेश आहे. जे त्याने कोलकात्याच्या सपाट खेळपट्टीवर ठोकले होते.

लिलावाच्या सेट-1 मध्ये ब्रूकचा समावेश आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. आयपीएलमध्ये बंगळूर, कोलकाता, मोहाली, मुंबई आणि अहमदाबादच्या खेळपट्ट्या सपाट आहेत. केकेआर आणि जीटीला मधल्या फळीतील फलंदाजाची गरज आहे, दोन्ही संघ ब्रूकसाठी 10 कोटींपेक्षा जास्त खर्च करू शकतात.

शार्दुल ठाकूर

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरकडे महत्त्वाच्या वेळी विकेट घेण्याची क्षमता आहे. खालच्या ऑर्डरमध्ये मोठे फटके मारूनही तो सामना संपवू शकतो. शार्दुलने भारताकडून 25 टी-20 सामन्यांमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेल्या शार्दुलला 2022 च्या मेगा लिलावात दिल्लीने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2023 च्या हंगामात, तो कोलकाताकडून खेळला होता. मागिल हंगामात त्याने 113 धावा केल्या आणि 6 विकेट घेतल्या. आयपीएलच्या एकूण करिअरमध्ये शार्दुलच्या नावावर 86 सामन्यांत 89 विकेट्ससह 286 धावा आहेत. अष्टपैलू शार्दुलचे नाव लिलावाच्या सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तो पंजाब, पुणे, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाताकडून खेळला आहे. भारताच्या सर्व संघांना अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे. अशा परिस्थितीत शार्दुलसाठी जीटी, सीएसके, एसआरएच, पीबीकेएस आणि आरसीबी यांसारखे संघ बोली लावतील असा अंदाज आहे.

पॅट कमिन्स

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकासह ॲशेस आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची किमया केली आहे. त्याच्या नावावर 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 55 विकेटसह 116 धावा आहेत. 30 वर्षीय अनुभवी कमिन्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 438 विकेट्ससह 1717 धावा आहेत. त्याने 42 आयपीएल सामन्यांमध्ये 379 धावा केल्या असून आणि 45 बळीही घेतले आहेत. 2021 च्या हंगामात तो केकेआरचा भाग होता. त्यावेळी त्याने 14 चेंडूत अर्धशतक फटकावले होते. कमिन्स 2020 मध्ये 15.50 कोटी रुपयांना विकला गेला होता, त्यामुळे या वेळीही तो जास्त किंमतीला विकला जाऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

अष्टपैलू कमिन्सचे नाव लिलावाच्या सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्लीकडूनही खेळला आहे. सर्व संघ त्यांच्यासाठी बोली लावतील. सीएसके, एसआरएच, पीबीकेएस आणि आरसीबी यांनाही भावी कर्णधाराची गरज आहे, त्यामुळे या संघांना कमिन्सचा समावेश करण्यात अधिक रस असेल.

वनिंदू हसरंगा

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू वानिंदू हसरंगा हा टी-20 क्रमवारीत नंबर-3 गोलंदाज आहे. आपल्या घातक लेग स्पिनच्या जोरावर तो कोणत्याही संघाचा भाग होऊ शकतो. तो खालच्या क्रमाने फलंदाजीही करतो. त्याने श्रीलंकेसाठी 58 टी-20 सामन्यांमध्ये 91 विकेट आणि 533 धावा केल्या आहेत. आरसीबीने त्याला आयपीएलमध्ये 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. गेल्या मोसमात तो दुखापतीमुळे अनेक सामने खेळू शकला नव्हता. आतापर्यंत खेळलेल्या एकूण 26 आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 35 विकेट आहेत.

हसरंगाचे नाव लिलावाच्या सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये इतकी आहे. तो आरसीबीसाठी 3 हंगाम खेळला आहे, गेल्या वेळी पंजाब आणि हैदराबादकडूनही त्याच्यासाठी बोली लावली गेली होती. यंदाच्या लिलावात केकेआर आणि सीएसके हे संघ देखील हसरंगासाठी मोठी बोली लावू शकतात.

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 8 वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळू शकतो. 2015 मध्ये तो शेवटचा आरसीबीकडून खेळला होता. तो नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. तसेच त्याच्याकडे वेग आणि स्विंगही आहे. फलंदाजीत खालच्या ऑर्डरमध्ये आक्रमक फटके मारून धावा वसूल करू शकतो. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने 16 विकेट घेतल्या. तसेच स्टार्कच्या नावावर 58 टी-20 सामन्यांमध्ये 73 विकेट आहेत. तिन्ही फॉरमॅट मिळून त्याने एकूण 647 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या 2 हंगामात त्याने 27 सामने खेळले आणि 34 विकेट्स घेतल्या. 2018 मध्ये केकेआरने स्टार्कला 9.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. वेगवान गोलंदाजांच्या सेट-4 मध्ये स्टार्कचे नाव आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. राजस्थान आणि हैदराबाद वगळता सर्व संघांमध्ये त्याच्यासाठी बोलीचे युद्ध होऊ शकते. तो लिलावातील सर्वात महागडा गोलंदाजही बनू शकतो.

जेराल्ड कोएत्झी

दक्षिण आफ्रिकेचा 23 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 20 विकेट घेतल्या. या स्पर्धेत त्याने भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या वेगवान आणि उसळी देणा-या चेंडूने खूप प्रभावीत केले. त्याच्या ही खासीयत आयपीएल संघांना देखील आकर्षित करू शकते. तो प्रथमच आयपीएल लिलावात उतरणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोएत्झीच्या नावावर फक्त 6 विकेट आहेत. पण त्याने 42 देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये 60 विकेट घेतल्या आहेत. त्याने द. आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळताना दिसणार आहे. कोएत्झीचे नाव लिलावाच्या सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. गुजरात, हैदराबाद, पंजाब, केकेआर, आरआर आणि आरसीबी हे संघ लिलावात त्याच्यासाठी बोली लावताना दिसतील.

हर्षल पटेल

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला आरसीबीने रिलीज केले. त्याच्या नावावर 91 आयपीएल सामन्यांत 111 विकेट आहेत. स्लोअर आणि नकल बॉल टाकण्यात पटाईत असलेला हर्षल मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये खूप प्रभावी ठरतो. खालच्या क्रमाने फलंदाजी करून तो आक्रमक फटकेही मारतो. त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 25 सामन्यात 29 विकेट आहेत. गेल्या मोसमात त्याने 13 सामन्यांत 14 बळी घेतले होते. मेगा लिलावात त्याला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले, त्यानंतर सीएसके आणि एसआरएच यांच्यात बोली युद्ध सुरू झाले होते. यंदा हर्षलचे नाव लिलावात सेट-2 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. लखनौ, पंजाब, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीचे संघ त्याच्यासाठी मोठ्या रक्कमेची बोली लावू शकतात.

लॉकी फर्ग्युसन

केकेआरने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला रिलीज केले. शाहरुखच्या संघाने त्याला 10 कोटी रुपयांना खरेदी केले होते. वेगवान आणि बाउन्सरसह क्रॉस सीमने गोलंदाजी करणाऱ्या फर्ग्युसनमध्ये मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे. त्याने न्यूझीलंडकडून 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 38 आयपीएल सामन्यांमध्ये 37 विकेट आहेत. त्याच्या नावावर 65 एकदिवसीय सामन्यात 99 विकेट्स आहेत. फर्ग्युसनचे नाव लिलावाच्या सेट-4 मध्ये आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. केकेआर व्यतिरिक्त तो गुजरात आणि पुण्यासाठीही आयपीएल खेळला आहे. यावेळी, आरआर आणि आरसीबी सोबत, सीएसके, एमआय, एसआरएच आणि पीबीकेएस यांसारखे संघ फर्ग्युसनसाठी मोठी बोली लावू शकतात. (IPL 2024 Auction)

Back to top button