Arshdeep Singh New Record : अर्शदीपने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज | पुढारी

Arshdeep Singh New Record : अर्शदीपने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर नव्या विक्रमची नोंद झाली आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ५ विकेट्स पटकावत इतिहास रचला आहे. अर्शदीप आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्या आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अर्शदीप आणि आवेशच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकन फलंदाजांनी अशरश: नांगी टाकली. (Arshdeep Singh New Record)

आफ्रिकेत चहल नंतर ५ विकेट पटकावणारा दुसरा भारतीय

अर्शदीप सिंगने १० षटकांत ३७ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या. कर्णधार केएल राहुलने उसळी मारणाऱ्या खेळपट्टीचा विचार करुन त्याला एक मोठा स्पेल दिला. कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासावर अर्शदीप खरा उतरला. त्याने सातत्याने विकेट्स पटकावल्या. भारतासाठी एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ बळी घेणारा अर्शदीप हा चौथा गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेणारा तो युझवेंद्र चहलनंतरचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (Arshdeep Singh New Record)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्स पटकावणारे गोलंदाज

  • अर्शदीप सिंग – २०२३ मध्ये जोहान्सबर्ग येथे ३७ धावांत ५ बळी
  • युझवेंद्र चहलने २०१८ मध्ये सेंच्युरियनमध्ये २२ धावांत ५ बळी घेतले
  • रवींद्र जडेजा – २०२३ मध्ये कोलकाता येथे ३३ धावांत ५ बळी
  • सुनील जोशी – १९९९ मध्ये नैरोबी येथे ५ धावात ५ बाद

भारताने द. आफ्रिकेचा डाव केवळ ११६ धावांत गुंडाळला

 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मानसिकतेने आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. मात्र अर्शदीप सिंग आणि आवेश खानच्या भेदक माऱ्याने आफ्रिकेचा डाव केवळ ११६ धावांमध्ये गुंडाळला. वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे आफ्रिकन फलंदाजांना अक्षरश: नांगी टाकली. (Arshdeep Singh New Record)

 

हेही वाचलंत का?

Back to top button