रोहितच्या संमतीनंतरच हार्दिकचा ‘राज्याभिषेक’

रोहितच्या संमतीनंतरच हार्दिकचा ‘राज्याभिषेक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवून सर्वांना धक्का दिला. एमआय फ्रँचाईझीने शुक्रवारी याची घोषणा केल्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली. चाहत्यांच्या द़ृष्टीने हा निर्णय एका दिवसात घेतलेला दिसत असला तरी या संपूर्ण घटनेमागचे सत्य काही वेगळेच असल्याची चर्चा रंगली आहे. वास्तविक, हार्दिकला संघाचा कर्णधार बनवण्याची योजना आधीपासूनच होती. कर्णधारपदाच्या अटीवरच तो मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पण यासाठी आधी रोहित शर्माची मान्यता घेण्यात आली. त्याने होकार दिल्यावरच हार्दिकचा राज्याभिषेक करण्यात आला.

गुजरात टायटन्सने हार्दिकला रिटेन ठेवल्यानंतर काही तासांतच मुंबई इंडियन्सने या अष्टपैलू खेळाडूला एका मोठ्या ऑल कॅश ट्रेडच्या माध्यमातून आपल्या संघात सामील केले. पण ही सर्व प्रक्रिया होण्यापूर्वी हार्दिक आणि मुंबई इंडियन्समध्ये मोठी डील झालेली होती. 'एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेआधीच घडामोडी सुरू होत्या.

कर्णधारपदाच्या अटीवर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. ऑल कॅश ट्रेडपूर्वी त्याने ही अट घालून मुंबई इंडियन्सला पेचात टाकले, पण काही बैठका झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिकची अट मान्य केली. त्यानंतरच हार्दिकने घरवापसी केली. अखेर शुक्रवारी (15 डिसेंबर) हार्दिकला अधिकृतपणे रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, फ्रँचाईझीचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. अनेक चाहत्यांनी मोठी टीका केली आहे.

एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करेल, असे सांगितले होते. तो आल्यानंतर संघ नेतृत्वात बदल करण्यात येईल, अशी माहिती हिटमॅनला देण्यात आली. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले. ज्यात मुंबईच्या व्यवस्थापनाने हार्दिक आणि रोहित यांना मनवण्यात यश आले. रोहितने पुढील हंगामात पंड्याच्या नेतृत्वात खेळण्याची तयारी दर्शवली. ज्यानंतर हार्दिकचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याचा मार्ग सुकर झाला, असेही अहवालात म्हटले आहे.

सूर्यकुमारचा हार्टब्रेक

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे लाखो चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. सूर्यकुमारने आपल्या इन्स्टाग्राम आणि एक्स अकांऊटवर ब्रोकन हार्टचा इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे हार्दिककडे संघाची धुरा दिल्याने सूर्या नाराज असल्याचे मानले जात आहे. हार्दिकची घरवापसी होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवला रोहितचा वारसदार मानण्यात येत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news