IND-W vs ENG-W : भारताला 478 धावांची आघाडी | पुढारी

IND-W vs ENG-W : भारताला 478 धावांची आघाडी

नवी मुंबई, वृत्तसंस्था : 9 वर्ष व 25 दिवसांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार्‍या भारतीय महिला संघाने (IND-W vs ENG-W) इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात 428 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंड महिला संघाचा पहिला डाव 136 धावांत गुंडाळला. दीप्ती शर्माने 5.3 षटकांत 7 धावा देताना 5 विकेटस् घेतल्या. दीप्तीने या कसोटीत 1985 सालच्या भारतीय महिला खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी केली.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताकडून शुभा सथिश (69), जेमिमा रॉड्रीग्ज (68), यास्तिका भाटिया (66), दीप्ती शर्मा (67) व हरमनप्रीत कौर (49) यांनी दमदार खेळ केला. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी 400 हून अधिक धावा करणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी 1935 मध्ये इंग्लंडने क्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध 4 बाद 431 धावा केल्या होत्या. त्यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव 44 धावांत गुंडाळला होता. अशा प्रकारे या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 475 धावा झाल्या होत्या. 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी 449 धावा झाल्या होत्या; परंतु यापैकी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 204 व इंग्लंडने 9 बाद 245 धावा केल्या होत्या.

गुरुवारच्या 7 बाद 410 वरून आज सुरुवात करताना भारतीय महिलांना 18 धावाच जोडता आल्या. पण, त्यांनी इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावा उभ्या केल्या होत्या.

फलंदाजीत दणकेबाज कामगिरी करणार्‍या टीम इंडियाने गोलंदाजीतही धडाकेबाज कामगिरी करीत इंग्लंडचा संपूर्ण संघ 35.3 षटकांत 136 धावांत गुंडाळला. नॅट शिव्हर-ब्रंटने सर्वाधिक 59 धावा केल्या.

अष्टपैलू दीप्ती.. (IND-W vs ENG-W)

* फलंदाजीत अर्धशतक झळकावणार्‍या दीप्ती शर्माने 5.3 षटकांत 4 निर्धाव षटके टाकली आणि 7 धावांत 5 विकेटस् घेतल्या. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय महिलाने कसोटीत केलेली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
* 1995मध्ये नीतू डेव्हिडने 53 धावांत 8 विकेटस् घेतल्या होत्या. 1999 मध्ये पुर्णिमा रावने 24 धावांत 5 विकेटस् घेतल्या होत्या.
* झुलन गोस्वामीने तीन वेळा (5-25, 5-33, 5-45) असा पराक्रम केला आहे. पण, दीप्तीने या कामगिरीसह विक्रमाची नोंद केली.
* महिला क्रिकेटमध्ये एकाच कसोटीत अर्धशतक व पाच विकेटस् घेणारी ती भारताची दुसरी खेळाडू ठरली. 1985 मध्ये शुभांगी कुलकर्णी हिने न्यूझीलंडविरुद्ध असा पराक्रम केला होता.

Back to top button