Suryakumar Yadav | टीम इंडियाला आणखी एक धक्का, क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव गंभीर जखमी | पुढारी

Suryakumar Yadav | टीम इंडियाला आणखी एक धक्का, क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोहान्सबर्ग येथे गुरुवारी (दि.14) भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 106 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. याच सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावले, पण क्षेत्ररक्षण करताना तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला चालता येईना. त्याला मैदानातून उचलून न्यावे लागले. (Suryakumar Yadav Injured)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर T20 संघाची जबाबदारी स्वीकारलेल्या सूर्यकुमार यादवबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. गुरुवारी (१४ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला चालताही येत नव्हते. मेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी सूर्याला उचलून मैदानाबाहेर नेले. सूर्याने मैदान सोडल्यानंतर या सामन्यात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. (Suryakumar Yadav Injured)

द. आफ्रिकाविरूद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. संघाने केवळ 29 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. केशव महाराजच्या सलग दोन चेंडूंवर शुभमन गिल (12) आणि तिलक वर्मा (0) बाद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी 70 चेंडूत 112 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

यशस्वी 41 चेंडूत 60 धावा करून झेलबाद झाला. तर सूर्याने आघाडी कायम ठेवत 56 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे चौथे शतक ठरले. सूर्याने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकार लगावले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझार्ड विल्यम्सने २-२ बळी घेतले. तर तबरेज शम्सी, नांद्रे बर्जरने 1-1 बळी घेतला.

क्षेत्ररक्षण करताना सूर्याला दुखापत

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. आफ्रिकेने दुसऱ्याच षटकात आपली पहिली विकेट गमावली. यानंतर क्षेत्ररक्षण करताना सुर्यकुमार जखमी झाला. यावेळी त्याच्या घोट्याला दुखापत झाली.

यावेळी फिजिओ आणि वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेत सुर्यकुमारवर उपचार केले. दुखापतीमुळे सुर्यकुमारने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला चालता येत नव्हते. म्हणून फिजिओ आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला उचलून मैदानातून बाहेर आणले. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

आफ्रिकेचा संघ 95 धावांवर गुंडाळला, कुलदीपने घेतल्या 5 विकेट

या सामन्यात 202 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ 13.5 षटकात 95 धावांत सर्वबाद झाला. संघाकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 35 आणि एडन मार्करामने 25 धावा केल्या. तर 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 2.5 षटकात 17 धावा देत 5 बळी घेतले.

हेही वाचा :

Back to top button