Vrinda Dinesh : आईसाठी ‘ड्रीम कार’ गिफ्ट देणार | पुढारी

Vrinda Dinesh : आईसाठी ‘ड्रीम कार’ गिफ्ट देणार

मुंबई, वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात वृंदा दिनेश हिच्यावर 1.30 कोटी रुपयांची ‘छप्पर फाड के’ बोली लागली. अजून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळता मिळालेली ही रक्कम पाहून तिच्यासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या रकमेतून आपण आपल्या आईस ड्रीम कार खरेदी करून तिला गिफ्ट देणार असल्याचे वृंदाने सांगितले.

9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीगच्या दुसर्‍या हंगामासाठी लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी बोली लावून काही नामांकित अन् काही नवख्या खेळाडूंना आपल्या संघाचे भाग बनवले. भारताच्या अनकॅप्ड खेळाडूंवर लागलेली कोट्यवधींची बोली क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून गेली. भारताची अनकॅप्ड टॉप ऑर्डर फलंदाज वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. लिलावात तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. तिला यूपी वॉरियर्सने 1.30 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. अनेक नामांकित खेळाडू अनसोल्ड राहिले असताना वृंदावर लागलेली ही बोली क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

वृंदाला लिलावात मोठी बोली लागल्यानंतर तिने यूपी वॉरियर्सच्या फ्रँचायझीसोबत बोलताना तिच्या स्वप्नाबद्दल भाष्य केले. तिने म्हटले की, माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणून मी व्हिडीओ कॉल न करता साधा कॉल केला. मला एवढी मोठी रक्कम मिळेल याची कल्पना नव्हती. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला या पैशातून आई-वडिलांचा सन्मान करायचा आहे, त्यांना एक कार भेट देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आताच्या घडीला माझे लक्ष्य हेच आहे. वृंदा दिनेशवर लागलेली बोली सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. ती कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. 23 वर्षीय फलंदाजाने वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये सात डावांत 154.01 च्या स्ट्राईक रेटने 211 धावा केल्या आहेत. ती भारत ‘अ’ संघाकडून इंग्लंड ‘अ’ विरुद्ध खेळली होती.

10 लाख ते 2 कोटी

वृंदा दिनेशशिवाय भारताची अनकॅप्ड खेळाडू काश्वी गौतमवर लागलेली बोली देखील अविश्वसनीय ठरली. काश्वी गौतम हिला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंटस् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात लढत झाली. यानंतर आरसीबीने अखेर माघार घेतली अन् काश्वी गुजरातच्या ताफ्यात गेली. आरसीबीने माघार घेतल्यानंतर यूपी वॉरियर्सने बोली लावायला सुरुवात केली होती. यूपी आणि गुजरातमध्ये जोरदार लढत झाली. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंटस्ने 2 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.

Back to top button