मुंबई, वृत्तसंस्था : 'डब्ल्यूपीएल' (WPL Auction 2024) अर्थात महिला प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. भारताची काश्वी गौतम आणि ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड यांना दोन कोटी इतकी रक्कम मिळाली. काश्वीला गुजरात जायंटस्ने, तर अॅनाबेलला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. यापाठोपाठ कर्नाटकची वृंदा दिनेश हिला 1.30 कोटी, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल 1.20 कोटी आणि फोबे लिचफिल्ड हिला 1 कोटी रुपये मिळाले. त्यांना अनुक्रमे यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंटस्ने आपापल्या संघात घेतले. दुसर्या महिला प्रीमिअर लीगसाठी शुक्रवारी लिलाव पार पडला. लिलावात 30 जागांसाठी 5 फ्रँचाईजींमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली.
यावेळी 165 खेळाडू लिलावात उतरले होते. यामध्ये 104 भारतीय आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पाच संघांची एकूण पर्स 17.65 कोटी रुपये होती. एकूण 30 स्लॉट रिक्त होते, त्यापैकी नऊ स्लॉट परदेशी खेळाडूंसाठी आहेत. एका संघात 15 ते 18 खेळाडू असू शकतात. एका संघात सहा विदेशी खेळाडू राहू शकतात.
काश्वीला 20 पट किंमत
महिला प्रीमिअर लीगच्या दुसर्या हंगामात भारताची अनकॅप्ड प्लेअर काश्वी गौतमवर पैशांचा पाऊस पडला. काश्वीची मूळ किंमत 10 लाख रुपये होती; पण तिला 2 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. तिला गुजरात जायंटस्ने 20 पट अधिक किमतीत विकत घेतले. भारतीय महिला क्रिकेटमध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. याचा फायदा काश्वीला झाला. गुजरातव्यतिरिक्त यूपी आणि आरसीबी संघदेखील काश्वीला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते; परंतु दोन्ही संघांच्या पर्समध्ये इतके पैसे नव्हते. याच कारणामुळे काश्वी गुजरातच्या ताफ्यात आली.
अॅनाबेलसाठी मुंबई, गुजरात यांच्यात चुरस (WPL Auction 2024)
ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगलीच चढाओढ झाली. दोन्हीही संघ पदार्पणाच्या हंगामातील फायनलिस्ट आहेत. मात्र, इथे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार मानली अन् अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले. अष्टपैलू अॅनाबेल सदरलँडची मूळ किंमत 40 लाख रुपये होती, तिला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांत खरेदी केले.
वृंदा यूपीच्या तंबूत
भारताची अनकॅप्ड टॉप ऑर्डर बॅटस्मन वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले आहे. यूपी वॉरियर्सने तिला 1.3 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. तिची मूळ किंमत फक्त 10 लाख रुपये होती. लिलावात सुरुवातीला गुजरात आणि आरसीबीने वृंदाला त्यांच्या संघात घेण्यासाठी रस दाखवला; पण शेवटी यूपीने तिला 1.3 कोटी रक्कम देऊन साईन केले. या सीझनमध्ये 1 कोटीहून अधिक रुपयांना विकली जाणारी वृंदा ही पहिली भारतीय आहे.
शबनीमसाठी मुंबईच्या पायघड्या
महिला प्रीमियर लीग 2024 च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने 1.2 कोटी रुपये खर्चून शबनीम इस्माईलला आपल्या संघात घेतले. शबनीम इस्माईल ही दक्षिण अफ्रिकेची वरिष्ठ खेळाडू आहे. तिचे वय 35 असून, ती महिला प्रीमियर लीग 2024 च्या लिलावातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. ती 2023 मध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळली होती. मात्र, तीन सामन्यांनंतर यूपीने तिला रीलिज केले. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये इस्माईल हॉबर्ट हरिकेन्सकडून खेळली. इस्माईल 14 सामन्यांत 13 विकेटस् घेत स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणार्यांच्या यादीत संयुक्तरीत्या दुसर्या स्थानावर पोहोचली.
फोबी पहिली कोट्यधीश (WPL Auction 2024)
ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डला गुजरात जायंटस्ने 1 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. फोबीची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवण्यात आली होती. तिला विकत घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंटस् यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. शेवटी गुजरातने बाजी मारत आपल्या संघात सामील करून घेतले.
असे असतील डब्ल्यूपीएलचे संघ
गुजरात जायंटस् : स्नेह राणा (कर्णधार), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिथा, वेदा कृष्णमूर्ती, अॅश्लेघ गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, कॅथरीन ब्राईस, तनुजा कान्वेर, बेथ मूनी, काश्वी गौतम, लॉरेन चीटल, मन्नत कश्यप, मेघना सिंग, शबनम शकील.
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरिस, शेफाली वर्मा, स्नेहा दीप्थी, एलिसे कॅप्सी, अॅनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, अश्विनीकुमारी, जेस जोनासेन, मरिझेन कॅप, मिन्नू मनी, राधा यादव, शिखा पांडे, अपर्णा मंडल, तानिया भाटिया, पूनम यादव, तितस साधू.
यूपी वॉरियर्स : लिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, लक्ष्मी यादव, वृंदा दिनेश, डॅनील व्यॉट, अंजली सर्वनी, लौरेन बेल, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुल्ताना, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, पार्श्वी चोप्रा, एस. यशश्री, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, पूनम खेमनार, सायमा ठाकोर.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियंका बाला, यास्तिका भाटिया, सायका इशाक, शबनीम इस्माईल, फातिमा जाफर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली सीव्हर, पूजा वस्त्राकर, संजीवन सजना, एस. बी. किर्थना, अमनदीप कौर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), दिशा कसत, आशा शोभना, एलिसे पेरी, हेथर नाईट, कानिका अहुजा, श्रेयांका पाटील, सोफी डिव्हाईन, इद्राणी रॉय, रिचा घोष, रेणुका सिंग, एकता बिश्त, केट क्रॉस, सिमरन बहादूर, जॉर्जिया वेअरहॅम, सबिनेनी मेघना, शुभा सथीश, सोफी मोलिनक्स.