Cricketers Birthday Special : टीम इंडियासाठी आजचा दिवस 'बर्थडे' स्‍पेशल, 'हे' आहेत 'बर्थडे बॉय' | पुढारी

Cricketers Birthday Special : टीम इंडियासाठी आजचा दिवस 'बर्थडे' स्‍पेशल, 'हे' आहेत 'बर्थडे बॉय'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज 6 डिसेंबर. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल 5 क्रिकेटपटूंचा जन्म झाला. यापैकी तिघांनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या ICC क्रिकेट वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळले आहेत. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, माजी वेगवान गोलंदाज आर.पी सिंग आणि कसोटीत त्रिशतक झळकावणारा करुण नायर यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त चाहत्‍यांकडून त्‍यांच्‍यावर शुभेच्‍छांचा वर्षाव हाेत आहे.  (Cricketers Birthday Special)

अष्टपैलू रवींद्र जडेजा

1988 मध्ये सौराष्ट्रमध्ये जन्मलेला रवींद्र जडेजा आज 35 वर्षांचा झाला आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये जडेजा टीम इंडियाचा भाग होता. 2012 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जडेजाने 67 कसोटी सामन्यांमध्ये 3 शतके आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2804 धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद 175 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. जडेजाने 275 विकेट्स घेतल्या आहेत. त्‍याने 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2756 धावा केल्या आहेत. ज्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 220 विकेट्स आहेत. जडेजाच्या नावावर 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 457 धावा आणि 51 विकेट आहेत. जडेजा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. (Cricketers Birthday Special)

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे मुख्य शस्त्र

1993 मध्ये अहमदाबादमध्ये जन्मलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा मुख्य गोलंदाज आहे. दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर राहिलेल्या बुमराहने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्याने 30 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बुमराहच्या नावावर कसोटीत 128 तर वनडेत 149 विकेट्स आहेत. बुमराहने आतापर्यंत टी-20मध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह नवीन आणि जुन्या चेंडूवर जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या धोकादायक यॉर्करसमोर फलंदाज नांगी टाकताना दिसतात.

श्रेयस अय्यर

नुकतेच वन-डे वर्ल्डकपमध्ये शानदार शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरचा जन्म 1994 साली मुंबईत झाला. 2021 साली कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रेयस अय्यरने 10 कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 666 धावा केल्या आहेत, तर 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 2331 धावा आहेत. ज्यात 5 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे श्रेयसने 51 टी-20 सामन्यांमध्ये 1104 धावा केल्या आहेत. ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या श्रेयसने टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे.

आरपी सिंग टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग

टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा जन्म 1985 मध्ये रायबरेली, उत्तर प्रदेश येथे झाला. आरपीने 14 कसोटी सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. तर, 58 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 69 विकेट आहेत. आरपी सिंगच्या नावावर 10 टी-20मध्ये 15 विकेट आहेत. आरपी अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. क्रिकेटनंतर आरपी कॉमेंट्रीकडे वळला. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता.

6 वर्षांपासून करुण नायर पाहतोय पुनरागमनाची वाट

कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणारा करुण नायर गेल्या 6 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावले होते. परंतु, करुण अजूनही टीम इंडियात परतण्याची वाट पाहत आहे. 1991 मध्ये जोधपूरमध्ये जन्मलेल्या करुण नायरला भारताकडून 6 कसोटी आणि 2 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने कसोटीत 374 धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 303 धावा नाबाद आहे. तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 46 धावा आहेत. करुणने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते.

हेही वाचा :

Back to top button