आयपीएल 2024 : लिलावात रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, ट्रॅव्हिस हेडला लागणार मोठी बोली

आयपीएल 2024
आयपीएल 2024
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 'आयपीएल 2024' साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी लिलावासाठी 1,166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. नोंदणीकृत खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. यासोबतच भविष्यात चमकणारे अनेक खेळाडू त्यात आहेत. यावेळी मिनी लिलाव होत असून, काही खेळाडूंना मोठी रक्कम मिळू शकते. आम्ही तुम्हाला अशाच 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर सर्वाधिक बोली लावली जाऊ शकते.

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने रीलिज केले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शार्दूल हा खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे. तो नक्कीच धावा खर्च करतो; पण विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो मैदानात सेट झालेल्या खेळाडूंची भागीदारी तोडण्यासाठी ओळखला जातो. याशिवाय तो चांगली बॅटिंगही करतो. त्यामुळेच अनेक फ्रँचायझी शार्दूलला विकत घेण्याचा विचार करत असतील.

वानिंदू हसरंगा

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला 'आरसीबी'ने रीलिज केले आहे. तो फिटनेसच्या समस्येमुळे बराच काळ संघाबाहेर राहिला आहे. मात्र, 'आयपीएल'पर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. हसरंगा हा टी-20 मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. यासोबतच तो खालच्या फळीतही आक्रमक फलंदाजी करू शकतो.

रचिन रवींद्र

न्यूझीलंडचा नवोदित युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने 2023 च्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. बॅटमधून धावांचा पाऊस पाडणारा रचिन रवींद्र चेंडूनेही चांगली कामगिरी करतो. यामुळेच आयपीएल फ्रँचायझींच्या नजरा त्याच्यावर आहेत. अनेक संघ त्याला त्यांच्या ताफ्यात जोडण्याची योजना आखत आहेत आणि त्यामुळे मोठी किंमत त्यालाही मिळू शकते.

जेराल्ड कोएत्झी

जेराल्ड कोएत्झीची गोलंदाजीची शैली बहुतांशी डेल स्टेनसारखीच आहे. तो आपल्या वेगाने फलंदाजांसाठी घातक ठरतो. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. कोएत्झीकडे अचूक बाऊन्सरही आहे. यामुळेच तो लिलावात सर्वात महागडा खेळाडूही ठरू शकतो.

ट्रॅव्हिस हेड

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये काय केले, हे सर्वांना माहीत आहे. त्या एका खेळीमुळे हेड 'आयपीएल' लिलावात सर्वात महागडा खेळाडूही बनू शकतो. यासोबतच तो अर्धवेळ फिरकीपटूही आहे. 'आरसीबी'कडून खेळलेल्या हेडला विकत घेण्यासाठी फ्रँचायझी 15 कोटींहून अधिक खर्च करू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news