'गब्‍बर' @ 38, चाहत्‍यांचा शिखर धवनवर शुभेच्‍छांचा वर्षाव | पुढारी

'गब्‍बर' @ 38, चाहत्‍यांचा शिखर धवनवर शुभेच्‍छांचा वर्षाव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा आज (दि. ५ डिसेंबर) वाढदिवस. यानिमित्त शिखर धवन याला सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), ‘आयपीएल’मधील पंजाब किंग्‍ज संघ आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.

‘बीसीसीआय’ने शिखर ट्‍विट करत शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. यामध्‍ये शिखरच्‍या कारकीर्दीवर प्रकाश टाकला आहे. शिखर धवन याने २६९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्‍याच्‍या नावावर १० हजार ८६७ धावा आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात त्‍याचा समावेश होता. दरम्‍यान वाढदिवसानिमित्त शिखरला चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूनी शुभेच्छा दिल्या.

शिखर धवन टीम इंडियातील एक डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. ताे बांगलादेशमध्ये 2004 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला आणि एकूण 505 धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्‍ऑक्‍टोबर 2010 मध्ये विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्‍यात त्‍याने पदार्पण केले. मार्च 2013 मध्ये मोहाली मैदानावर कसोटी पदार्पणातच त्‍याने सर्वात जलद शतक झळकावले होते. या सामन्‍यात त्‍याने 174 चेंडूत 187 धावा केल्‍या होत्‍या.

शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये , धवन सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. या दोन्‍ही स्‍पर्धेत त्‍याने ‘गोल्डन बॅट’ पटकावली होती. २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो मालिकावीर ठरला होता. तसेच २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. ‘आयपीएल’च्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच 2018 च्या आशिया कपमध्येही तो मालिकावीर ठरला होता.

हेही वाचा : 

Back to top button