Pistol cylinder explosion : पिस्टल सिलिंडरचा स्फोट; नेमबाजाचा अंगठा तुटला | पुढारी

Pistol cylinder explosion : पिस्टल सिलिंडरचा स्फोट; नेमबाजाचा अंगठा तुटला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीजवळील फरिदाबाद येथे सरावादरम्यान एअर पिस्टल सिलिंडरचा स्फोट होऊन नेमबाज पुष्पेंद्र कुमार या नेमबाजाचा डावा अंगठा तुटल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. पुष्पेंद्र हा भारतीय वायुसेनेत कार्यरत असून, तो भोपाळ येथील राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेच्या तयारीसाठी नेमबाजीचा सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. पुष्पेंद्रसाठी चांगली गोष्ट म्हणजे, तो नेमबाजीसाठी वापरत असलेला उजवा अंगठा मात्र सुरक्षित आहे.

10 मीटर एअर रायफल प्रकारातील राष्ट्रीय नेमबाज पुष्पेंद्रकुमार हा भारतीय लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात भरती आहे. मुख्य सिलिंडरमधून पिस्टल सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पुष्पेंद्रकुमार उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील आहे. त्याच्या प्रशिक्षकाने सांगितले की, पुष्पेंद्र आता राष्ट्रीय स्पर्धेला मुकणार आहे. ही त्याच्यासाठी मोठी दुखाची गोष्ट असेल. 15 दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. तो दिल्लीच्या कर्णीसिंग रेंजवर सराव करीत असतो. प्रशिक्षकांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर पुष्पेंद्र कुमार बरे होण्याची 90 टक्के शक्यता आहे. त्यानंतर तो नेमबाजीही करू शकेल. कारण, त्याचा उजवा हात शाबूत आहे.

कसे चालते कार्य?

एअर पिस्टल आणि एअर रायफलमध्ये बॅरेलच्याबरोबर खाली एक छोटे गॅस सिलिंडर जोडलेले असते. जेव्हा ट्रिगर दाबला जातो, तेव्हा सिलिंडरमधील गॅस एअरगनच्या हातोड्याला धडकतो, ज्यामुळे गोळी बाहेर पडते. काही काळ पिस्टर वापरले की एअर पिस्टलचे सिलिंडर कॉम्प्रेसर किंवा पोर्टेबल सिलिंडरच्या मदतीने भरावे लागते.

एअर पिस्टल किंवा एअर रायफल शुटर आठ-दहा वर्षांनंतर बंदुकीचे सिलिंडर बदलतात. जर ते वेळीच बदलले नाही, तर दुर्घटना घडू शकते. अशा घटना घडू शकतात, असे बंदुक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Back to top button