AUS vs PAK Test Series : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! | पुढारी

AUS vs PAK Test Series : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK Test Series : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 14 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस याचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे तो ॲशेस मालिकेत खेळू शकला नव्हता पण आता तो पर्थमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने 3 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत.

याशिवाय ऑस्ट्रेलियन संघात फारसा बदल झालेला नाही. ॲशेस मालिकेत खेळलेल्या इतर 10 खेळाडूंचीही या सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. नॅथन लायनचेही दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने टॉड मर्फीची जागा घेतली आहे. याशिवाय अॅलेक्स कॅरीचाही यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन देखील संघाचा एक भाग आहे. (AUS vs PAK Test Series)

खराब फॉर्म असूनही सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळायला आवडेल, असे त्याने याआधी सांगितले होते. त्याचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड चांगले आहे, त्यामुळे त्याला घेतल्याची चर्चा आहे. (AUS vs PAK Test Series)

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (AUS vs PAK Test Series)

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाईल. यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे आहे.

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

दरम्यान, या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व शान मसूद करणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सपाटून मार खाल्ल्यानंतर बाबर आझमने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पीसीबीने शान मसूदची कसोटी कर्णधार पदी निवड केली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि अशा परिस्थितीत शान मसूदसमोर आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक

चार दिवसीय सामना : पीएम इलेव्हन विरुद्ध पाकिस्तान, 6-9 डिसेंबर, कॅनबेरा

पहिली कसोटी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 14-18 डिसेंबर, पर्थ

दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 26-30 डिसेंबर, मेलबर्न

तिसरी कसोटी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 3-7 जानेवारी, सिडनी

Back to top button