WPL 2024 Auction : 165 खेळाडूंवर लागणार बोली

WPL 2024 Auction : 165 खेळाडूंवर लागणार बोली

मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसर्‍या हंगामाकडे कूच करत आहे. 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमिअर लीग 2024 (WPL 2024 Auction) साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी एकूण 165 खेळाडूंनी डब्ल्यूपीएल 2024 च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 104 भारतीय आणि 61 परदेशी खेळाडू आहेत. 165 क्रिकेटपटूंपैकी 15 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 56 आणि अनकॅप्ड खेळाडू 109 आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त 30 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी 9 जागा परदेशी खेळाडूंसाठी असतील. (WPL 2024 Auction)

दिल्ली कॅपिटल्स : आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे 15 खेळाडूंचा संघ आहे, यामध्ये 5 परदेशी खेळाडू आहेत. दिल्लीच्या फ्रँचायझीने आतापर्यंत 11.25 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर 2.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्समध्ये सध्या तीन स्लॉट रिक्त आहेत, त्यापैकी एक विदेशी खेळाडूसाठी असेल.

गुजरात जायंटस् : गुजरात जायंटस्कडे सध्या आठ खेळाडू असून, त्यापैकी तीन परदेशी आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत 7.55 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये 5.95 कोटी रुपये शिल्लक आहेत. गुजरातच्या संघात सध्या 10 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत, ज्यात 3 परदेशी शिलेदार असतील.

मुंबई इंडियन्स : चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडे सध्या 13 खेळाडू आहेत, त्यापैकी पाच परदेशी आहेत. मुंबईच्या फ्रँचायझीने आतापर्यंत 11.4 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये 2.21 कोटी रुपये शिल्लक आहेत. संघात सध्या पाच खेळाडूंसाठी स्लॉट आहेत, त्यामध्ये एक परदेशी खेळाडू असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात सध्या तीन परदेशी खेळाडूंसह 11 खेळाडू आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत 10.15 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये 3.35 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीच्या संघात सध्या 7 खेळाडूंसाठी स्लॉट रिक्त असून, तीन परदेशी खेळाडूंचा यात समावेश होणार आहे.

यूपी वॉरिअर्स : यूपी वॉरिअर्सच्या संघात सध्या 5 परदेशी खेळाडूंसह 13 शिलेदार आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत 9.5 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या कोट्यात 4 कोटी शिल्लक आहेत. संघात सध्या 5 खेळाडूंसाठी जागा असून, यामध्ये एका परदेशी खेळाडूचा समावेश होईल. (WPL 2024 Auction)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news