IND vs AUS 3rd T20 : भारताने ऑस्ट्रेलियाला दिले 223 धावांचे लक्ष्य, ऋतुराज गायकवाडचे वादळी शतक | पुढारी

IND vs AUS 3rd T20 : भारताने ऑस्ट्रेलियाला दिले 223 धावांचे लक्ष्य, ऋतुराज गायकवाडचे वादळी शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 222 धावा केल्या. भारताकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा (123*) केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याशिवाय तिलक वर्मा 24 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी झाली. शिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने 39 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचे बहुतांश गोलंदाज महागडे ठरले. ऑस्ट्रेलियाचे 20 वे षटक ग्लेन मॅक्सवेलने टाकले. या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारून 30 धावा वसूल केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या.

भारताकडून टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज आठवा भारतीय ठरला. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, विराट कोहली, दीपक हुडा आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला. ऋतुराजने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सात षटकार मारले. त्याचवेळी तिलकने आपल्या डावात चार चौकार मारले. त्याआधी यशस्वी जैस्वाल सहा धावा करून बाद झाला तर इशान किशन खाते न उघडता बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. सूर्या 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, अॅरॉन हार्डी आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियाची मालिकेत 2-0 ने आघाडी

टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी आघाडी मिळवेल. त्याने आपल्या संघात चार बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टच्या जागी ट्रॅव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे. तर शॉन अॅबॉटच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ आणि अॅडम झाम्पाच्या जागी केन रिचर्डसन खेळत आहे. स्टीव्ह स्मिथही हा सामना खेळत नसल्याने त्याच्या जागी अॅरॉन हार्डीला संधी मिळाली आहे. दुसरीकडे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या जागी आवेश खान खेळत आहे.

भारताला तिसरा धक्का

भारताला 11व्या षटकात 81 धावांवर तिसरा धक्का बसला. अॅरॉन हार्डीने सूर्यकुमार यादवला यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. सूर्याला 29 चेंडूत 39 धावा करता आल्या. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले.

भारताला दुसरा धक्का

तिसऱ्या षटकात 24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. केन रिचर्डसनने इशान किशनला स्टॉइनिसकरवी झेलबाद केले. पाच चेंडू खेळणाऱ्या ईशानला खातेही उघडता आले नाही.

भारताला पहिला धक्का

डावाच्या दुसऱ्याच षटकात 14 धावांवर भारताला मोठा धक्का बसला. मोठ्या फटका मारण्याच्या नादात यशस्वी जैस्वालने (6) आपली विकेट गमावली. जेसन बेहरेनडॉर्फचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक मॅथ्यू वेडपर्यंत पोहोचला.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्धी कृष्णा.

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), केन रिचर्डसन, नॅथन एलिस, तन्वीर संघा, जेसन बेहरेनडॉर्फ.

Back to top button