Sanju Samson Interview : संजू सॅमसनचे मोठे विधान म्हणाला, ‘मला दुर्दैवी क्रिकेटर मानतात, पण…’ | पुढारी

Sanju Samson Interview : संजू सॅमसनचे मोठे विधान म्हणाला, ‘मला दुर्दैवी क्रिकेटर मानतात, पण...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanju Samson Interview : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनची निवड न झाल्याने त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत. एवढेच नाहीतर राजकारण्यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. यात काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर आघाडीवर आहेत. त्यांनी टीम इंडियात संजूची निवड न झाल्याबद्दल संताप व्यक्त केला. रोहित, विराट, केएल राहुल आणि हार्दिक यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले, पण संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळाले नाही. यादरम्यान, संजूची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सॅमसन म्हणतो की, चाहते मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर मानतात, पण मी जिथेपर्यंत पोहोचलो आहे त्याने समाधानी आहे. खरंतर मी विचार केला नव्हता तेवढे यश मला मिळाले आहे. (Sanju Samson Interview)

क्रिकेटच्या वर्तुळात संजू सॅमसनला भारतातील सर्वात दुर्दैवी क्रिकेटर संबोधले जाते. त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केले. परंतु त्यानंतर त्याला पाच वर्षे संधी मिळाली नाही. त्यानंतर 2020 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने पुढचा सामना खेळला. 2015 मध्ये भारतीय संघासाठी पहिला सामना खेळणाऱ्या संजूला 9 वर्षांत केवळ 13 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटसोबतच आयपीएलमध्ये संजूने अनेकवेळा दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवले, पण कधी तो त्या संधीचे सोने करू शकला नाही तर कधी राखीव खेळाडू राहूनच घरी परतला. नुकत्याच सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी देखील त्याची निवड झाली नाही.

एका यूट्यूब चॅनलसाठी संजू सॅमसनने मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी खेळाडू म्हणतात, पण मी आत्ता जिथवर पोहोचलो आहे, ते कित्येक पटीने जास्त आहे.’ (Sanju Samson Interview)

या मुलाखतीदरम्यान सॅमसनने (Sanju Samson) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबद्दलही (Rohit Sharma) भाष्य केले. तो म्हणाला की, ‘रोहित शर्मा हा उत्तम कर्णधार आहे. तो पहिला किंवा दुसरा व्यक्ती आहे जो माझ्याकडे आला आणि त्याने माझी विचारपूस केली. अरे संजू, कसा आहेस… तू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीस. मुंबई इंडियन्सविरुद्ध खूप षटकार मारलेस. तू खरोखरच चांगली फलंदाजी करतोस. तो स्पर्धेदरम्यान मला खूप सपोर्ट करतो.’

संजू सॅमसनसाठी (Sanju Samson) भारतीय संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी नुकतीच मुंबईत संजूशी भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली. पण या बैठकीत काय घडले हे समोर आलेले नाही. मात्र, संजू हा निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा एक भाग असल्याचे संकेत मिळत आहेत.

संजू सॅमसन (Sanju Samson) हा आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचे (RR) नेतृत्व करतो. त्याला कर्णधारपद भूषवण्याचा भरपूर अनुभव आहे. अशा प्रतिभावान खेळाडूकडे निवड समिती दुर्लक्ष का करते? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. त्यामुळे सोशल मीडियावर संजूचे चाहते त्याला भारतातील सर्वात दुर्दैवी क्रिकेटर म्हणतात.

टी-20 वर्ल्ड कपसाठी संजूची निवड होणार?

संजू सॅमसनने (Sanju Samson) 2021 मध्ये टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये संजूचे रेकॉर्ड चांगले आहे. त्यामुळे वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या संघात त्याची निवड होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र संघ व्यवस्थापनाने संजूपेक्षा वनडे रेकॉर्ड खराब असणा-या सूर्यकुमारवर विश्वास दाखवला. त्यामुळे आता पुढे 2024 च्या टी-20 विश्वचषकात संजूला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Back to top button