Marlon Samuels Banned : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेपूर्वी ‘या’ क्रिकेटपटूवर 6 वर्षांची बंदी, ICCची मोठी कारवाई | पुढारी

Marlon Samuels Banned : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेपूर्वी ‘या’ क्रिकेटपटूवर 6 वर्षांची बंदी, ICCची मोठी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर आयसीसीने सहा वर्षांची बंदी (Marlon Samuels Banned) घातली आहे. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. निवृत्तीनंतर तो देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहे. मात्र आता तो भ्रष्टाचारात दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. सॅम्युअल्स पुढील सहा वर्षे कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही. अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सॅम्युअल्स दोषी आढळला आहे.

सॅम्युअल्सवर (Marlon Samuels Banned) लादण्यात आलेल्या बंदीची माहिती देताना आयसीसीच्या एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल म्हणाले की, सॅम्युअल्स जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. यादरम्यान त्याने अनेक भ्रष्टाचारविरोधी सत्रांमध्ये भाग घेतला आणि भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत त्याला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होती. तो आता निवृत्त झाला असला तरी, सॅम्युअल्स त्यावेळी गुन्ह्यात भागीदार होता. त्यामुळे सहा वर्षांची बंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही क्रिकेटपटूला एक मजबूत संदेश म्हणून काम करेल, असा विश्वास अॅलेक्स मार्शल यांनी व्यक्त केला.

आयसीसीने 2021 मध्ये केले होते आरोप

आयसीसीने सप्टेंबर 2021 मध्ये केलेल्या आरोपानुसार सॅम्युअल्सने (Marlon Samuels Banned) अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 चे उल्लंघन केले होते. आयसीसीचे विभाग भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍यांना भेटवस्तू, पेमेंट, आदरातिथ्य किंवा इतर फायद्यांचा अहवाल न देण्याचा संदर्भ देतात, ज्यामुळे खेळाची प्रतिमा मलीन होऊ शकते. यासोबतच तपासात सहकार्य न करणे, माहिती लपवून तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे यांसारख्या कलमांचाही संबंध होता.

सॅम्युअल्स अनेकदा सापडला वादात (Marlon Samuels Banned)

सॅम्युअल्स त्याच्या कारकिर्दीत अनेकदा वादात सापडला आहे. मे 2008 मध्ये, भेटवस्तू, पैसे स्वीकारल्याबद्दल तो दोषी आढळला होता. त्यानंतर सॅम्युअल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2014 मध्ये, त्याने तत्कालीन कर्णधार ड्वेन ब्राव्होच्या बोर्डासोबतच्या पेमेंट वादाच्या प्राश्वभूमीवर भारत दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयालाही विरोध केला होता. यानंतर आयसीसीने 2015 मध्ये त्याची गोलंदाजी बेकायदेशीर ठरवली होती आणि त्याच्यावर एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती.

शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये खेळला

सॅम्युअल्सने 2012 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिजसोबत दोन टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. या दोन्ही विजेतेपदाच्या फायनलमध्ये त्याने विंइंडिजसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 14 डिसेंबर 2018 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. सॅम्युअल्सने 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटीत 32.64 च्या सरासरीने 3917 धावा, एकदिवसीय सामन्यात 32.97 च्या सरासरीने 5606 धावा आणि टी-20 मध्ये 116.23 च्या स्ट्राईक रेटने 1611 धावा केल्या आहेत. सॅम्युअल्सने कसोटीत 7 शतके आणि 24 अर्धशतके, एकदिवसीय सामन्यात 10 शतके आणि 30 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 10 अर्धशतके केली आहेत. याशिवाय सॅम्युअल्सने कसोटीत 41, वनडेत 89 आणि टी-20मध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.

Back to top button