IND vs AUS Final : विश्वचषकाच्या रणभूमीतून : एक धक्का और दो… | पुढारी

IND vs AUS Final : विश्वचषकाच्या रणभूमीतून : एक धक्का और दो...

निमिष पाटगावकर

एखाद्या गिर्यारोहकाला माऊंट एव्हरेस्ट सर करायला बेस कॅम्पपासून सुरुवात करून दरमजल करत जेव्हा शिखराच्या टोकापर्यंत पोहोचायला फक्त एक अंतिम टप्पा जेव्हा दिसतो तेव्हा त्याला इतकी मजल मारल्याचा आत्मविश्वासही असतो, पण हा शेवटचा टप्पा पार करायला किती प्रयत्न करावे लागणार आहेत याची जाणीवही असते. भारतीय संघाला आपल्या विश्वचषकाच्या (IND vs AUS Final) वाटचालीत असाच हा अंतिम टप्पा दिसत आहे, पण समोर आव्हान आहे ते पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे. 8 ऑक्टोबरला आपला पहिला सामना ज्या ऑस्ट्रेलियाबरोबर चेन्नईला खेळत भारताने या विश्वचषकाची सुरुवात केली त्याच ऑस्ट्रेलियाबरोबर विश्वचषकात ते अंतिम सामन्यासाठी आज सज्ज होत आहेत. एका अर्थाने आपले हे वर्तुळ पूर्ण झाले. विश्वचषकाच्या सुरुवातीला सर्व क्रिकेट पंडितांनी इंग्लंडला अंतिम सामन्यासाठी झुकते माप दिले होते, पण पहिले दोन सामने हरून ऑस्ट्रेलियाने सलग सात सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आणि द. आफ्रिकेला हरवून अंतिम सामन्यात पोहोचले.

भारताची या विश्वचषकातील स्वप्नवत कामगिरी बघितली तर पहिल्या सामन्यात याच ऑस्ट्रेलियाने भारताला अडचणीत पकडले होते तेव्हा आजचा अंतिम सामना असेल तो भारताच्या जबरदस्त फॉर्ममधल्या फलंदाजीविरुद्ध ऑस्ट्रेलियन जलदगती त्रिकुटाचा आणि झम्पाचा त्याचप्रमाणे भारताच्या बुमराह, शमी, सिराज विरुद्ध वॉर्नर, हेड, स्मिथ, लॅबूशेन यांचा. नाणेफेकीचा कौल आजही महत्त्वाचा राहील आणि नाणेफेक जिंकणारा संघ पहिली फलंदाजी घेईल. आपल्या न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणे या अंतिम सामन्यातही दोन्ही डावांतील पहिली पंधरा षटके सामन्याची दिशा ठरवतील. जो संघ पहिल्या पंधरा षटकांत वर्चस्व गाजवेल त्याचाच विश्वचषक असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यात चेन्नईला खेळपट्टी डबल पेस होती, पण अहमदाबादला खेळपट्टी मंद आणि फिरकीला साथ देणारी असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इथल्या वाळूच्या बेसवर बनवलेल्या खेळपट्टीवर चेंडू खाली बसलेला आपण पाहिले. तेव्हा चेन्नईला जे झाले ते मनातून काढून टाकत रोहित शर्माने ज्याप्रमाणे आफ्रिदी, विली, बोल्ट सारख्या जगातल्या डावखुर्‍या उत्तम गोलंदाजांवर आक्रमण केले तसेच तो स्टार्क विरुद्ध चढवेल यात शंका नाही. डावखुरे जलदगती गोलंदाज त्याला पूर्वी अडचणीत आणायचे, पण क्रीजचा योग्य वापर किंवा स्टेप अप होत आपले फटके तो तीस यार्डच्या डोक्यावरून सहज मारत आहे. त्याच्या 10 डावांत त्याने 133 च्या स्ट्राईक रेटने 42 चौकार आणि 21 षटकारांसह फक्त 266 चेंडूंत 354 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा अर्धशतक किंवा शतक करतो का याला सध्या तरी महत्त्व नाही तर तो प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमणाची लय सातत्याने बिघडवत आहे हे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा आणि गिल आपल्याला उत्तम सुरुवात देऊ शकले तर आपल्याला कोहली, अय्यर आणि राहुल यांची फलंदाजी पुरेशी असेल. पाच फलंदाज, जडेजा सारखा अष्टपैलू आणि पाच गोलंदाज का सहा फलंदाज आणि जडेजा धरून पाच गोलंदाज हा आजचा कळीचा मुद्दा आहे. (IND vs AUS Final)

भारताच्या पहिल्या सामन्यातील अडखळती सुरुवात आठवली तर अंतिम सामन्याला सूर्यकुमार यादव सहावा फलंदाज म्हणून आधार ठेवत उपांत्य फेरीचा संघ कायम ठेवायचा पहिला पर्याय आहे. इथली खेळपट्टी फिरकीला साथ देते, ऑस्ट्रेलिया आणि ऑफ स्पिन यांचे वाकडे लक्षात घेता सूर्याऐवजी अश्विनला घ्यायचा दुसरा पर्याय आहे किंवा तिसरा पर्याय म्हणजे फिरकी खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाज आणि दोन जलदगती गोलंदाज खेळवत सिराजच्या ऐवजी अश्विनचा समावेश. यात मला तिसरा पर्याय स्वीकारला जायची शक्यता कमी वाटते. कारण आपल्या संघात प्रत्येकाच्या भूमिका ठरलेल्या आहेत. बुमराहने आपल्या पहिल्या चार शतकांत पंधरा ते वीस धावा देत एखादा बळी घ्यायचे काम आहे तर सिराज अगदी चार षटकांत तीस-पस्तीस धावाही दिल्या तरी त्याच्याकडून दोन ते तीन बळींची अपेक्षा आहे. अश्विनचा नेटस् मधला सराव बघता दुसर्‍या पर्यायाचा विचार होईल असे दिसते. न्यूझीलंडविरुद्धही आपण फक्त पाच गोलंदाज घेऊन खेळताना काय अडचण येते हे बघितले. विनिंग कॉम्बिनेशन बदलावे लागले तरी सूर्याऐवजी अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवावे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अनुभव हाही तितकाच महत्त्वाचा असतो.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन पराभवांनंतर त्यांचेही धोरण काहीसे रोहित शर्मासारखेच आहे. सुरुवातीला ट्रॅव्हिस हेड दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता, पण जेव्हा तो वॉर्नरच्या जोडीला आला तेव्हा त्यांचा रनरेट पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 राखला जाऊ लागला. वॉर्नर-हेड जोडीचे काम शर्मा-गिल सारखे झाल्यावर स्टीव्ह स्मिथचा रोल हा कोहलीसारखा असेल. एक बाजू तो लावून धरेल आणि दुसर्‍या बाजूने फटकेबाजी करतील. शनिवारी जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने खेळपट्टी बघितली तेव्हा ती आधीच्या सामन्यात वापरलेली आहे हे स्पष्ट झाल्यावर खेळपट्टीवर रोलर फिरवून आज रविवारी काय स्वरूप असेल त्यावरून ऑस्ट्रेलिया लॅबूशेन का स्टॉईनीसला संघात घ्यायचे हे ठरवेल. ऑस्ट्रेलिया संघात स्टार्क, हेजलवूड, कमिन्स, झम्पा, मॅक्सवेल यांच्या जोडीला ट्रॅव्हिस हेड आणि लॅबूशेन किंवा स्टॉईनीस इतके गोलंदाजीचे पर्याय आहेत. भारताचे गोलंदाजीत पर्याय वाढवायलाही अश्विनची निवड सार्थ ठरते. (IND vs AUS Final)

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वगुणांची जी छाप या विश्वचषकात पाडली आहे ती असामान्य आहे. त्याचे लिडिंग फ्रॉम फ्रंट थाटात स्वतः धोके पत्करून प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करणे, गोलंदाजीतील बदल, कल्पक क्षेत्ररक्षण, डीआरएस घेण्याची अचूकता हे सर्वच आपल्या विजयी वाटचालीत उठून दिसले. भारतीय संघाचा कर्णधार हा एक काटेरी मुकुट असतो, पण रोहित शर्माने तो सहज पेलला आहे. यात मुंबई क्रिकेटचे मोठे योगदान आहे. मुंबईत क्रिकेटपटूला आपल्या मोठ्या किट बॅगसह जेव्हा सकाळच्या गर्दीत चर्चगेट लोकलमध्ये घुसावे लागते तेव्हाच त्याचा अस्तित्वाचा संघर्ष चालू होतो. मुंबईच माणसाला प्रचंड कष्ट, अपेक्षांचे ओझे घेऊन वावरताना ‘आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमे जिंदगी बीता दो’ शिकवत चेहर्‍यावर हसू ठेवायला शिकवते. रोहित शर्मा प्रत्येक खेळाडूला आपापली भूमिका समजावून दिल्यानंतर त्या खेळाडूला पूर्ण मोकळीक देतो. हे कर्णधाराचे असामान्य काम करताना आपला कर्णधारपदाचा मुकुट तो सर्वांशी संवाद साधण्यात मध्ये येऊ देत नाही त्यामुळे तो खेळाडूंनाच काय क्रिकेटप्रेमीनांही आपल्यातलाच एक वाटतो.

2011 चा विश्वचषक धोनीने जिंकला तरी तो तेंडुलकरची इच्छा पूर्ण करणारा ठरला. त्या 2011 च्या विश्वचषकात न खेळल्याचे शल्य घेऊन जगलेला रोहित शर्मा आज भारताचा कर्णधार आहे. ते शल्य पूर्णपणे पुसून टाकायला रोहित शर्माचा शेवटचा विश्वचषक भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीने आणि तमाम करोडो भारतीयांच्या इच्छाशक्तीने आज आपण जिंकायलाच हवा.

Back to top button