SA vs AUS 2nd Semi-Final Match : ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेला 212 धावांत रोखले | पुढारी

SA vs AUS 2nd Semi-Final Match : ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेला 212 धावांत रोखले

कोलकाता; वृत्तसंस्था : वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांना 212 धावांत गुंडाळले. डेव्हिड मिलर खेळला नसता तर आफ्रिकेला सन्मानजनक धावा उभारता आल्या नसत्या.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या 13 षटकांत दक्षिण आफ्रिकेला 4 धक्के दिले. स्टार्क व हेझलवूड यांच्या भेदक मार्‍यासमोर आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी ढेपाळली. डेव्हिड मिलर आणि हेन्रीच क्लासेन यांनी 95 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. मिलर व कोएत्झी यांची 53 धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. कोएत्झी 19 धावांवर झेलबाद झाला; परंतु त्याने डीआरएस घेतला असता तर तो नाबाद राहिला असता.

2015 च्या बाद फेरीतील सामन्यात फॉफ ड्यू प्लेसिसने न्यूझीलंडविरुद्ध 82 धावांची खेळी केली होती आणि ती वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील आफ्रिकेकडून झालेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. आज मिलरने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला. ऑसींचा प्रमुख गोलंदाज स्टार्क आला अन् त्याने केशव महाराजला माघारी पाठवला. मिलरने षटकाराने शतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकांत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मिलर सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने 116 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत 212 धावांवर माघारी परतला.

Back to top button