Shreyas Iyer Century : श्रेयस अय्यरने सलग दोन शतके झळकावून रचले ‘हे’ विक्रम | पुढारी

Shreyas Iyer Century : श्रेयस अय्यरने सलग दोन शतके झळकावून रचले ‘हे’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer Century : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 4 गडी गमावून 397 धावा केल्या. टीम इंडियाच्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतके झळकावली. किंग कोहलीने 113 चेंडूत 117 तर अय्यरने 70 चेंडूत 105 धावांची खेळी केली. अय्यरची फटकेबाजी दिवाळीतल्या आतषबाजी सारखी राहिली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार ठोकले. अशाप्रकारे अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. यासह तो विश्वचषकात सलग दोन शतके फटकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम राहुल द्रविडने केला होता. 1999 च्या विश्वचषकात द्रविडने सलग 2 शतके झळकावली होती.

अय्यरचा चमत्कार (Shreyas Iyer Century)

श्रेयस अय्यरनेही या विश्वचषकात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. या विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव मधल्या फळीतील फलंदाज आहे. इतकेच नाही तर त्याने आपल्या इनिंगमध्ये 8 षटकार मारून एक मोठा विक्रमही केला. विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात इतके षटकार मारणारा अय्यर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याने सौरव गांगुली आणि युवराज सिंगला मागे टाकले. या माजी खेळाडूंनी प्रत्येकी 7 षटकार ठोकले होते. एवढेच नाही तर सेमीफायनलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. तेंडुलकरने 2003 मध्ये केनियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 85 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोहलीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 117 धावांची विक्रमी खेळी साकारली.

विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज (Shreyas Iyer Century)

8 – श्रेयस अय्यर वि. न्यूझीलंड, मुंबई 2023
7 – सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉटन, 1999
7 – युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007
6 – कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स 1983
6 – रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद 2023
6 – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, मुंबई 2023

विश्वचषक उपांत्य फेरीतील भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या (Shreyas Iyer Century)

117- विराट कोहली विरुद्ध न्यूझीलंड, 2023
111*- गांगुली विरुद्ध केनिया, 2003
105- श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड, 2023
85- सचिन तेंडुलकर विरुद्ध पाकिस्तान, 2011
83- सचिन तेंडुलकर विरुद्ध केनिया, 2003
77- रवींद्र जडेजा विरुद्ध न्यूझीलंड, 2019
65- सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका, 1996
65- एमएल धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2015

अय्यरची खेळी का खास?

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील श्रेयस अय्यरची खेळी खूप खास आहे. वास्तविक, शुभमन गिल जखमी असताना श्रेयस अय्यर क्रीजवर उतरला. त्यावेळी गिल खूप वेगाने धावा काढत होता. टीम इंडियाचा रनरेट राखण्याची जबाबदारी अय्यर यांच्यावर होती, जी त्याने चोखपणे बजावली. त्याने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले आणि पुढच्या 32 चेंडूत त्याने शतकही ठोकले. अय्यरने विराट कोहलीसोबत 128 चेंडूत 163 धावा जोडल्या.

अय्यरचे सलग दुसरे शतक

विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रेयस अय्यरने बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले होते. त्या सामन्यात अय्यरने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 94 चेंडूत 128 धावा तडकावल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये त्याने शतक झळकावून इतिहास रचला आहे. या सामन्यात त्याच्या आधी विराट कोहलीने शतक साजरे केले. तो 113 चेंडूत 117 धावा करून टीम साऊथीचा बळी ठरला. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक ठरले. अशाप्रकारे तो वनडे इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला.

भारताचे न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य

तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांशिवाय शुभमन गिलच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. शुभमन गिल 66 चेंडूत 80 धावा करून नाबाद परतला. याशिवाय केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 1 बळी घेतला.

Back to top button